• Sat. Sep 21st, 2024

मुंबईत ७५ ठिकाणी ‘श्रीराम फेऱ्या’, अयोध्येतील सोहळ्यासाठी व्यापाऱ्यांकडून आयोजन

मुंबईत ७५ ठिकाणी ‘श्रीराम फेऱ्या’, अयोध्येतील सोहळ्यासाठी व्यापाऱ्यांकडून आयोजन

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: अयोध्येत येत्या २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मुंबईमध्ये ७५ ठिकाणी श्रीराम फेऱ्यांचे आयोजन व्यापारी वर्गाने केले आहे. देशभरातील व्यापाऱ्यांची सर्वात मोठी संघटना असलेल्या अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कॅट) यासाठी पुढाकार घेतला आहे.

अयोध्येत २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरात प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने देशभर रामभक्तांकडून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामध्ये व्यापाऱ्यांनीही सहभाग घेतला आहे. याअंतर्गत त्यांनी देशभर राम फेऱ्यांचे आयोजन केले आहे. याबाबत ‘कॅट’चे महाराष्ट्र सरचिटणीस शंकर ठक्कर यांनी सांगितले की, ‘महामुंबई क्षेत्रातील बाजारपेठांमध्ये ७५ ठिकाणी अशा प्रकारे राम फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये मुंबईभरातील साडेतीन ते चार लाख व्यापारी सहभागी होतील. प्रभू श्रीरामांबद्दलची भजने, गाणी यांच्या गायनासह श्रीरामांच्या तसबिरीची यात्रा, प्रवचने यांचा त्यात समावेश असेल.’

याखेरीज ‘कॅट’ने यानिमित्ताने ‘दुकान दुकान अयोध्या’ हे अभियानदेखील सुरू केले आहे. त्यामध्ये प्रत्येक दुकानात रामभक्तीमय वातावरण निर्माण केले जाणार आहे. श्रीराम झेंडा, पटका, स्टीकर, पोस्टर व राम मंदिराचे छायाचित्र दुकानांना भेट दिले जाईल. ते त्यांनी दर्शनी भागात लावावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हे अभियान ‘कॅट’कडून मुंबईसह देशभरातील विविध बाजारपेठेत २२ जानेवारीपर्यंत चालविले जाणार आहे.

‘रामराज्य दिन’ घोषित

‘कॅट’ने २२ जानेवारी हा दिवस रामराज्य दिन म्हणून घोषित केला आहे. देशभरातील २० हजारांहून अधिक व्यापारी संघटनांचे ५ कोटी व्यापारी ‘कॅट’शी संलग्न आहेत. हे सर्व व्यापारी त्या दिवशी हा दिवस साजरा करतील, असे ठक्कर यांनी सांगितले.

अयोध्येतील मंदिरात रामलल्लाच्या पाच मूर्तींपैकी कुठल्या मूर्तीची स्थापना करणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed