• Sat. Sep 21st, 2024
महाविकास आघाडीत सहभागी होणार नाही, ही काळया दगडावरची रेघ : राजू शेट्टी

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर बोलताना राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीत सहभागी होण्याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली.

यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण आम्ही स्वतंत्रपणे लढणार आहोत. तसेच दोन वर्षापूर्वी महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कारखानदारांना पूरक अशी भूमिका घेतली. त्यात एफआरपीचे तुकडे करण्याचा निर्णय घेतला. भूमी अधिग्रहण कायद्याची मोडतोड करून रस्त्यालगतच्या जमिनीचा शेतकऱ्यांना जो चार ते पाच पट मोबदला मिळायचा तो कमी करण्याचे काम महाविकास आघाडीने केले. हेच आमच्या आक्षेपाचे मुद्दे आहेत. त्यामुळे या मुद्द्यावर स्पष्टीकरण येत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा प्रश्नच येत नसल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.

अदानीविरोधात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांची भेट

राजू शेट्टी म्हणाले, मी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. कारण उद्धव ठाकरे यांनी धारावीच्या मुद्द्यावरून अदानी विरोधात लढाई सुरू केली आहे. दुसरीकडे अदानी यांचा शेतकऱ्यांनाही मोठा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर मी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

केंद्र सरकारने अदानी यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी आयात होणाऱ्या खाद्यतेलावर पाच टक्के आयात शुल्क कमी केले आहे. त्यामुळे देशातील सोयाबीनचे भाव पडले आहेत. अगदी २००० साली असलेला ४ हजार रुपयांचा भाव आजही २४ वर्षानंतरही तेवढाच आहे. त्यातच आता आयात शुल्क २०२५ पर्यंत कमी करण्यात आले आहे. त्यामुळे सोयाबीनला भाव नसल्याचे दिसून येत आहे, असं राजू शेट्टी म्हणाले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी उद्धव ठाकरे यांची भेट

उद्धव ठाकरे हे सोयाबीनच्या प्रश्नावर, कर्जमाफीच्या मुद्द्यावर मराठवाड्यात दौरा सुरू करणार आहेत. त्यासाठी अदानी विरोधात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची जी लढाई आहे, ती शेतकऱ्यांची सुद्धा लढाई आहे. कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्या या अडीच टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वैनगंगा नदीवर जे पटगवचे धरण आहे. या पावणेचार टीएमसी धरणाचे पाणी अदानी उद्योग समूह आठ हजार चारशे कोटी रुपये खर्च करून सिंधुदुर्गात 2100 मेगावॅटची वीज निर्मिती करणार आहे, त्यासाठी वापरणार आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि सीमा भागातील जनतेला, शेतीला पाणी कमी पडणार आहे. या विरोधात सुद्धा आम्ही आंदोलन सुरू करत आहोत. एक संघर्ष समिती या प्रकल्पासाठी निर्माण केली आहे. म्हणून सिंधुदुर्गातील जनतेची आम्हाला साथ हवी आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर मधील जनतेने एकत्र मिळून हा लढा उभारला तर पाणी वाचेल, असंही राजू शेट्टी म्हणाले.

आज राजरोसपणे अदानी समूहाला पाणी देऊन उलटी गंगा वाहण्याचं काम सुरू आहे. या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा मिळावा, यामुळे आम्ही उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांच्या लढ्यामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत, असं वचन उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे राजू शेट्टी म्हणाले.

लोकसभेच्या सहा जागा लढवण्यावर राजू शेट्टी ठाम

राजू शेट्टी यांनी लोकसभेसाठी आपली भूमिका जाहीर करताना म्हटले की, स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या सहा जागा लढवणार आहे. त्यात हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, बुलढाणा, परभणी आणि माढा या मतदारसंघात निवडणूक लढवण्याचे अंतिम असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed