वन विभागाचे कर्मचारी संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या कार्यकर्त्यांसह ताम्हिणी, मुळशी, सिंहगड, लोणावळ्यासह पुण्यातील टेकड्यांवर रात्री गस्त घालणार आहेत.
गेल्या काही वर्षांत शहरातील प्रशासनातर्फे जाहीर होणारी नियमावली, कारवाई पाहता, ३१ डिसेंबरचे ‘सेलिब्रेशन’ शहराबाहेर, निर्मनुष्य ठिकाणी, जंगल परिसरात जाऊन पार्ट्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. गड-किल्ल्यांवर, पायथ्याला, राखीव वनक्षेत्रात बेकायदा तंबू टाकून पर्यटक गेटटुगेदर वाढली आहेत. यातून काही गैरप्रकारही उघडकीस आल्याने वन विभागाने गेल्या दोन वर्षांपासून राखीव वनक्षेत्र, टेकड्यांवरील ३१ डिसेंबरच्या रात्रीची गस्त वाढवली आहे. संरक्षित क्षेत्रात झालेल्या पार्ट्यांवर कारवाई केली आहे. यंदाही शनिवार ते सोमवार तीन दिवस जोडून सुट्ट्या आल्याने पर्यटकांची गर्दी वाढण्याची चिन्हे आहेत, हे लक्षात घेऊन वनक्षेत्रात तंबू टाकून होणाऱ्या पार्ट्यांना लगाम घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
‘टेकड्या, सिंहगडावर गस्त वाढविणार’
– नाताळच्या सुट्ट्या सुरू झाल्या, की गड, किल्ले, वनक्षेत्र, पुण्यातील टेकड्यांवर फिरायला जाणाऱ्यांची संख्या वाढते.
– नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अनेक जण पार्टी करण्यासाठी राखीव वनक्षेत्रात जातात.
– फिरण्यास मज्जाव केल्यास उपद्रवी पर्यटकांकडून वनात वणवेही पेटवले जातात.
– राखीव वनक्षेत्रांत सूर्यास्तानंतर फिरण्यास बंदी आहे.
– नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील टेकड्या, वनक्षेत्र आणि सिंहगडावर आम्ही गस्त वाढविणार आहोत.
– नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
– सिंहगडावर एरवीप्रमाणेच संध्याकाळी सहा वाजल्यानंतर पर्यटकांना प्रवेश मिळणार नाही, अशी माहिती सहायक वनसंरक्षक दीपक पवार यांनी दिली.
‘गडांवर रात्री मुक्काम नको’
‘यंदा शनिवार ते सोमवार अनेकांना सलग सुट्ट्या असल्याने नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सिंहगड, राजगड आणि तोरणा या राज्य संरक्षित किल्ल्यांवर पर्यटक मोठ्या संख्येने जाण्याची शक्यता आहे. या धर्तीवर सुरक्षेचा उपाय म्हणून आम्ही वेल्हे पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना पत्र पाठविणार आहोत. किल्ल्यांवर कायदा सुव्यवस्थेचा भंग होऊ नये, यासाठी पर्यटक गडावर रात्री मुक्कामी जाणार नाहीत, यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी आम्ही पत्रात करणार आहोत,’ अशी माहिती पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहणे यांनी दिली.
कॅम्पिंग ३१ डिसेंबरला टाळा
‘नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजे ३१ डिसेंबरला राज्यातील अनेक गडकिल्ल्यांवर पर्यटक गर्दी करतात. गेल्या काही वर्षांत गडकिल्ल्यांसह ऐतिहासिक वास्तूंमध्ये या दिवशी गैरवर्तनाचे प्रकारही आढळले आहेत. त्यामुळे पर्यटकांनी या वारसास्थळांच्या परिसरात जाणे; तसेच रात्री गडकिल्ल्यांवर कॅम्पिंग, वस्ती करणे टाळावे,’ असे आवाहन ‘अखिल महाराष्ट्र महासंघा’ने केले आहे.
पर्यटकांनी महाराष्ट्राचे वैभव असलेल्या गड कोटांवर जाऊन मद्यपान करणे, मांस तयार करणे अथवा खाणे, मोठमोठ्याने गाणी लावून नाचणे अयोग्य आहे. किल्ल्यांवर मोठी गर्दी झाल्यास अपघाताचीही शक्यता असते. ‘अखिल महाराष्ट्र महासंघा’तर्फे पुढील तीन दिवस याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.- उमेश झिरपे, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र महासंघ