• Mon. Nov 25th, 2024

    युवा नाशिककर बनला CRPF परेड कमांडर; उपनिरीक्षक अजित गायकवाड यांनी मिळवला मान

    युवा नाशिककर बनला CRPF परेड कमांडर; उपनिरीक्षक अजित गायकवाड यांनी मिळवला मान

    सौरभ बेंडाळे, नाशिक : प्रतिकूल आर्थिक परिस्थितीवर मात करून महाविद्यालयीन जीवनापासूनच देशसेवेसाठी झपाटलेल्या नाशिकच्या तरुणाने केंद्रीय राखीव पोलिस दलात (सीआरपीएफ) उपनिरीक्षकपदाला गवसणी तर घातलीच. पण, प्रशिक्षणादरम्यान थेट दीक्षांत सोहळ्याच्या ‘परेड कमांडर’ होण्याचा मानही मिळविला आहे.

    ‘सीआरपीएफ’चे प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक अजित सुरेश गायकवाड असे त्यांचे नाव आहे. सव्वीसवर्षीय अजित हे मूळचे नाशिक शहरातील आडगावचे रहिवासी असून, शुक्रवारी (दि. २९) होणाऱ्या केंद्रीय राखीव पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षकांच्या ९५ व्या तुकडीचे ते ‘परेड कमांडर’ राहणार आहेत. महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालयात शुक्रवारी सकाळी नऊ वाजता दीक्षांत सोहळा होईल. सोहळ्यास सीआरपीएफ दिल्ली मुख्यालयाचे विशेष महानिदेशक दलजितसिंह चौधरी यांची प्रमुख उपस्थिती राहील. मुदखेड प्रशिक्षण महाविद्यालयाचे महानिरीक्षक तथा प्राचार्य ए. वाय. व्ही. कृष्णा, कमांडंट तथा मुख्य प्रशिक्षण अधिकारी लीलाधर महारानिया, उपकमांडंट अमित शर्मा, सहायक कमांडंट हरी शंकर प्रसाद, जॅकीकुमार, वासुदेव यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहतील. या सोहळ्यातील परेडचे नेतृत्व करण्याचा बहुमान अजित यांना मिळाल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

    तटरक्षक दल ते सीआरपीएफ…

    अजित यांच्या मातोश्री संगीता या गृहिणी, तर वडील सुरेश शंकर गायकवाड बस वाहक म्हणून कार्यरत होते. करोना काळात त्यांचे निधन झाले. अजित यांनी शालेय शिक्षण आडगावच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पूर्ण केल्यावर आरवायके महाविद्यालयातून फिजिक्स विषयात पदवी घेतली. सन २०२० मध्ये ‘नाविक जीडी’ परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी भारतीय तटरक्षक दलात ‘स्टोअर अस्टिस्टंट’ पदाची धुरा सांभाळली. दरम्यान, त्यांनी स्टाफ सिलेक्शन कमिशनअंतर्गत ‘सीपीओ’ परीक्षा उत्तीर्ण केली. सन २०२२ च्या अखेरीस ६५१ वी रँक मिळवून भारतीय केंद्रीय राखीव पोलिस दलात उपनिरीक्षक होण्याचा मान अजित यांनी मिळविला. नोकरी सांभाळून अभ्यासाकरिता नियमित दोन ते तीन तास वेळ काढून त्यांनी हे यश मिळविले. यापुढे खातेअंतर्गत परीक्षेतून ‘अस्टिस्टंट कमांडंट’ होण्याचे त्यांचे ध्येय आहे.
    रामभूमीतून भाजपच्या प्रचाराचा नारळ! १२ जानेवारी रोजी पंतप्रधान मोदी नाशिक दौऱ्यावर
    दोन पुरस्कारांचे मानकरी

    ‘सीआरपीएफ’च्या ९५ व्या तुकडीत २२१ उपनिरीक्षकांनी ९ जानेवारी ते २९ डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रशिक्षण घेतले. कर्तव्य, नक्षलवाद व आतंकवाद, हत्यारे माहिती व वापर, मॅप रीडिंग, जीपीएस वापर यासह तांत्रिक विश्लेषणावर आधारित विविध मुद्द्यांवर प्रशिक्षण देण्यात आले. अजित यांनी प्रशिक्षणादरम्यान दाखविलेल्या कामगिरीबद्दल त्यांना दोन पुरस्कार जाहीर झाले आहेत. ‘बेस्ट इन इनडोअर ट्रॉफी’ व ‘बेस्ट ऑलराउंडर ट्रॉफी’ या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात येईल.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed