विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू आहेत. यात दोनवेळा लांबणीवर पडलेल्या विधी, शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र शाखेच्या परीक्षा १९ डिसेंबरपासून सुरू आहेत. यात बीएड अभ्यासक्रमाचा मंगळवारी दुपारच्या सत्रात ‘मेथड-ए- लँग्वेज अँड सायन्स’चे पेपर होते. निश्चित वेळेनुसार विद्यार्थी परीक्षा कक्षात पोहचले. परीक्षा केंद्रावर विद्यापीठाकडून आलेली प्रश्नपत्रिका डाउनलोड झाली. विद्यार्थ्यांच्या हाती प्रश्नपत्रिका पडली आणि विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका आजच्या पेपरशी संबंधित नसल्याचे सांगितले. काही केंद्रावर परीक्षा प्रमुखांच्या लागलीच लक्षात आल्याने अशा केंद्रावर प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यात आली नसल्याचे सांगण्यात येते.
विद्यार्थी, केंद्र प्रमुख, पर्यवेक्षक शिक्षकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर विद्यापीठाला या बाबत कळविण्यात आले. त्यानंतर परीक्षा विभागाकडून दुसरी प्रश्नपत्रिका पाठविण्यात आली. त्यानंतर प्रश्नपत्रिका डाउनलोड करून छायांकित प्रती काढत परीक्षा घेण्यात आली. विद्यापीठ अंतर्गत चार जिल्ह्यात विविध ४४ महाविद्यालयातील पाच हजारपेक्षा अधिक विद्यार्थी बीएड अभ्यासक्रमाची परीक्षा देत असल्याचे सुत्रांनी सांगितले. विद्यापीठ पदवी, पदव्युत्तर परीक्षेत एकाच वेळी दोन पेपर, अभियांत्रिकी परीक्षेत पेपर फुटल्याची घटना नुकतीच समोर आली होती. त्यानंतर मंगळवारी बीएड अभ्यासक्रमाच्या परीक्षेतही गोंधळ उडाल्याने परीक्षा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
विद्यापीठ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएड प्रथम वर्षातील द्वितीय सत्राचा पेपर होता. विद्यापीठाकडून सुरुवातीला पाठविण्यात आलेली वार्षिक परीक्षा पद्धतीप्रमाणे होती, असे सांगण्यात येते. २ जानेवारी रोजी हा पेपर आहे. जुन्या अभ्यासक्रमाप्रमाणे द्वितीय वर्षाचा हा पेपर आहे. द्वितीय सत्र आणि द्वितीय वर्ष यामुळे प्रश्नपत्रिका पाठविताना गोंधळ झाल्याची चर्चा विद्यापीठात होती. बीएड अभ्यासक्रमाच्या परीक्षेत २ जानेवारी रोजीच्या पेपरला नवीन प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे. २६ डिसेंबर रोजी हा पेपर देण्यात आल्याने प्रश्नपत्रिका संच बदलून परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा विभागाकडे प्रत्येक विषयासाठी तीन प्रश्नपत्रिका संच तयार असतात. आता त्यातील दुसरी प्रश्नपत्रिका दिली जाणार असल्याचे विद्यापीठातील अधिकारी सुत्रांनी सांगितले.