एसटी महामंडळाच्या विविध बसमध्ये विधीमंडळ सदस्य, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक, महिला, अधिस्वीकृतीधारक पत्रकार, एसटी कर्मचारी यांच्यासाठी राखीव आसन व्यवस्था करण्यात आली आहे. एसटी महामंडळाने नव्याने कार्यप्रणाली कार्यान्वित केलेली आहे. जुन्या कार्यप्रणालीमध्ये बसमधील आसनाची रचना वेगवेगळी आहे. तसेच, बस प्रकारानुसार विविध सामाजिक घटकांना विविध बसेसमध्ये आसन क्रमांक देखील वेगवेगळे आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या. राखीव आसन व्यवस्थेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी एसटी महामंडळाकडून एक जानेवारीपासून राखीव आसन क्रमांकामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अशी असेल राखीव आसन व्यवस्था
– दिव्यांगाना आता एसटीच्या साध्या बसमध्ये ३, ४, ५ आणि ६ असे आसन क्रमांक राखीव असतील.
– विधीमंडळ सदस्यांना एसटीच्या साध्या बसमध्ये एक, दोन ऐवजी सात,आठ असे क्रमांक असणार आहेत. तसेच, निमआराम, शिवाई, शिवशाही बसमध्ये देखील सात ते आठ क्रमांकाची आसने, तर, शयनायनमध्ये दोन तीन ही आसने राखीव असणार आहेत.
– ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या साध्या बसमध्ये तीन, चार आणि पाच ऐवजी ११ व १२ ही आसने राखीव राहतील. तर, निमआराम, शिवाई, शिवशाही बसमध्ये देखील ११ व १२ ही आसने राखीव. तर शयनायनमध्ये सहा क्रमांकाचे आसन राखीव राहील.
– स्वातंत्र्य सैनिकांना साध्या बसमध्ये सहा व सात ऐवजी १३ व १४ क्रमांकाची आसने राखीव
– महिलांना साध्या बसमध्ये १९,२०,२१,२२, २९,३० ही आसने राखीव ठेवली जातील. तसेच, निमआराम, शिवाई, शिवशाही बसमध्ये हीच आसने राखीव असतील. शयनायन बसमध्ये चार व पाच क्रमांकाची असणे राखीव राहतील.
– अधिस्विकृतीधारक पत्रकारांसाठी साध्या बसमध्ये २५ व २६ ऐवजी आता २७ व २८ क्रमांकाचे आसन राखीव असेल. तसेच, निमआराम, शिवाई, शिवशाही बसमध्ये देखील हीच आसने राखीव ठेवण्यात आली आहेत.
– एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी साध्या बसमध्ये ३१ आणि ३२ क्रमांकाचे आसन राखीव असेल. इतर बसमध्ये त्यांच्यासाठी आसन राखीव असणार नाही.