बारामतीमधील कार्यक्रमाला फिनोलेक्स जे पॉवर सिस्टम लिमिटेडचे चेअरमन दीपक छाबरियादेखील हजर होते. ‘विद्या प्रतिष्ठाननं नवा प्रकल्प हाती घेतला आहे. तंत्रज्ञानामुळे अभियांत्रिकी क्षेत्रात वेगानं बदल होत आहेत. हे बदल स्वीकारण्यासाठी आपण तयार असायला हवं,’ असं पवार म्हणाले.
आम्ही भारतात आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचं पहिलं केंद्र तयार करत आहोत. त्याच्या उभारणीचं काम सुरू आहे. त्यासाठी २५ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यासाठी निधीची व्यवस्था झाली आहे. माझ्या आवाहनाला सहकाऱ्यांनी लगेच प्रतिसाद दिला. फर्स्ट सिफोटेक कंपनीनं या प्रकल्पासाठी १० कोटी रुपये दिले. त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार, असं पवार म्हणाले.
या भाषणात पवारांनी गौतम अदानींचा विशेष उल्लेख केला. अदानींनी संस्थेच्या नावे २५ कोटींचा चेक पाठवला. या दोघांच्या मदतीमुळे आज आपण या ठिकाणी दोन्ही प्रकल्प उभारत आहोत. त्यासाठीचं काम सुरू झाल्याचं पवार म्हणाले. १७ ते २२ जानेवारी या कालावधीत कृषी विकास प्रतिष्ठानच्या सहकार्यानं बारामतीत एका कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येत आहे. त्यात लाखो शेतकरी सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ठाकरेंचा मोर्चा अन् पवारांकडून कौतुक
महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं काही दिवसांपूर्वीच धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात मोर्चा काढला होता. त्यावेळी ठाकरेंनी अदानींवर हल्लाबोल केला. विरोधी पक्षातील अनेक नेते सातत्यानं अदानींवर टीका करत असताना दुसऱ्या बाजूला पवार कायमच अदानींची बाजू घेत आले आहेत. पवारांच्या आत्मचरित्रातही अदानींचा विशेष उल्लेख आहे.