• Sat. Sep 21st, 2024
‘सोलर’ स्फोटातील मृतांवर अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश अन् हंबरडा

म. टा. प्रतिनिधी, नागपूर

बाजारगाव येथील सोलर एक्स्प्लोझिव्ह लिमिटेडमध्ये रविवारी झालेल्या भीषण स्फोटात नऊ श्रमिकांचा मृत्यू झाला होता. छिन्नविछिन्न अवस्थेत आढळलेल्या मृतांची डीएनए चाचणीद्वारे ओळख पटवून गुरुवारी अत्यंत शोकाकुल वातावरणात येथील मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी नियतीने केलेल्या क्रुर थट्टेने मनात दाटून आलेला आक्रोश कुटुंबीयांच्या वाहत्या डोळ्यातून व्यक्त झाला.

सोलर कंपनीतील कास्ट बूस्टर प्लांटमध्ये कार्यरत नऊ श्रमिकांसाठी रविवारची सकाळ आयुष्याचा दुर्दैवी अंत घेऊन उदयास आली. दररोजप्रमाणे कामावर गेलेल्या या श्रमिकांचा सकाळी ९ ते ९.३० वाजतादरम्यान स्फोट होऊन जागीच मृत्यू झाला. या स्फोटाने संपूर्ण इमारत ध्वस्त झाली होती. मलबा हटवून त्याखाली असलेल्या मृतांचे छिन्नविछिन्न अवस्थेतील देह काढण्यासाठी प्रशासनाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. मृतांच्या अवयवाचे जे तुकडे सापडलेत त्यावरून डीएनए चाचणी करत सर्वांची ओळख पटविण्यात आली.

त्यानंतर गुरुवारी मोक्षधाम येथे सर्वांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. युवराज चारोडे (रा. बाजारगाव) यांच्यावर महानुभवीय पंथाच्या प्रथेप्रमाणे दफनविधी करण्यात आला. तर, ओमेश्वर मच्छीर्के (रा. चाकडोह, ता. नागपूर), मीता उईके (अंबाडा सोनक, ता, काटोल), आरती सहारे (रा. कामठी, ता. काटोल), श्वेताली मारबते (रा. कन्नमवार जि. वर्धा), पुष्पा मानापुरे (रा. शिराळा, जि. अमरावती), भाग्यश्री लोणारे (रा. भुज तुकुम जि. अमरावती), रुमिता उईके (रा. ढगा, जि. वर्धा), मौसम पटेल (रा. मोहाडी, जि. भंडारा) या उर्वरित आठ श्रमिकांना अग्नी देण्यात आला. यावेळी कुटुंबीयांचे नातेवाईक, बाजारगाव येथील ग्रामस्थ तसेच कंपनीतील श्रमिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंत्यसंस्कारानंतरही बराच वेळ मृतांचे कुटुंबीय हतबल नजरेने तिथे बसून होते.

कुटुंबीयांच्या भावनेचा राखला आदर

मृत्यू पावलेल्या सर्व श्रमिकांवर बाजारगाव येथील शासकीय जागेवर एकाचवेळी अंत्यसंस्कार होतील, असे सांगण्यात आले होते. मात्र, मृतांच्या कुटुंबीयांनी सामूहिक अंत्यसंस्काराला विरोध दर्शविला होता. ‘आम्हाला बॉडी द्या, आम्ही त्यांच्यावर अंत्यविधी करू’, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली. कुटुंबीयांची भावना लक्षात घेत एकाचवेळी सामूहिक अंत्यसंस्कार करणे टाळण्यात आले. त्याऐवजी प्रत्येक मृत श्रमिकाचे नातेवाईक आल्यानंतर त्यांच्या जाती-धर्माच्या परंपरेनुसार अंत्यविधी झालेत. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, ‘सोलार’ तसेच ‘पेसो’चे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed