‘राष्ट्रीय पुस्तक न्यासा’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘पुणे पुस्तक महोत्सवा’त ‘स्वातंत्र्यवीर सावरकर समज- गैरसमज’ या विषयावर संपत बोलत होते. उद्योजक अमित परांजपे यांनी संपत यांची मुलाखत घेतली. या वेळी महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे उपस्थित होते. नोटांवर केवळ एका व्यक्तीचे छायाचित्र आहे. येत्या काळात हे चित्र बदलेल का, या उपस्थितांच्या प्रश्नावर संपत म्हणाले, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांना महाराष्ट्रात देवाचे स्थान आहे. मात्र, त्यांच्याबाबत राज्याबाहेरील लोकांना माहिती नाही. त्यांच्याबद्दल केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) पुस्तकांत माहिती नाही. ही परिस्थिती असतानाच, आपल्या स्वातंत्र्याच्या इतिहासात ठरावीक लोकांनाच स्थान दिले असून, इतरांना डावलले आहे, असे स्पष्ट होते. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर पुस्तक लिहिण्याचा निर्णय घेतला.’
‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलचा इतिहास माहिती नसतानाही काही व्यक्ती त्यांच्यावर टीका करतात. सावरकर यांच्यावर प्रेम करा किंवा त्यांचा विरोध करा. मात्र, त्यांच्याबाबतचे तथ्य जाणून घ्या आणि त्यानंतर आपले मत व्यक्त करा,’ असे आवाहन संपत यांनी केले.
‘हिंदूत्व हे जाती-पातींच्या विरोधात आहे, हे सर्वांत प्रथम सावरकरांनी पटवून दिले. सर्व जातींमधील मुले सावरकरांमुळे एकाच शाळेत शिकू लागली. त्यांच्यामुळे वंचितांना मंदिरात प्रवेश मिळाला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना संरक्षण आणि परराष्ट्रीय धोरणाची उत्तम जाण होती. त्या वेळी त्यांनी केलेली भाकिते खरी ठरत आहेत,’ असे संपत यांनी सांगितले. संपत यांनी सावरकर यांच्या जीवनप्रवासाबाबत माहिती दिली.
‘…तर त्यांच्या कार्याचा सन्मान’
‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वापर राजकीय पक्षांनी केवळ आपल्या फायद्यासाठी केला आहे. पक्षांनी निवडणुकीत, जाहीरनाम्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत अनेक आश्वासने दिली. मात्र, त्यांच्या पूर्ततेबाबत तत्परतेने कार्यवाही केली नाही. सावरकर यांचे कार्य महान आहे. त्यांना भारतरत्न मिळाल्यास त्यांच्या कार्याचा सन्मान होईल,’ अशी अपेक्षा संपत यांनी व्यक्त केली.