उद्धव ठाकरे यांचं सरकार आलं तेव्हा धारावी बद्दल का निर्णय घेतले नाहीत? सरकार आल्यानंतर काही महिन्यांनी कोरोना आला. त्यावेळी तुमचं सरकार असताना तुम्ही का निर्णय घेतले नाहीत? तुम्हाला कोणी अडवलं होतं? धारावीचा पुनर्विकास करायचा होता तर तुमचं सरकार असताना करून टाकायचा, कोणी तुमचे हात धरले होते, असा सवाल शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना केला. राज्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी विरोधक करत आहेत. मात्र, तुमचं सरकार असताना तुम्ही आरक्षणाचे विधेयक विधानसभेत का मंजूर केलं नाही? हा प्रश्न तर कोरोना काळात सुरू झाला नव्हता. मराठा समाजाच्या आरक्षणाचे मोर्चे वर्षानुवर्षे निघत आहेत. मग तुम्ही त्यांना आरक्षण का दिलं नाही? असा सवाल शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला विचारला.
संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी मानले होते आभार
शर्मिला ठाकरे यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणी एसआयटी चौकशी वरून आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली होती. त्यावरून संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी शर्मिला ठाकरे यांचे आभार मानले होते. यासंदर्भात बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या, रमेश किणी केसपासून आजपर्यंत त्यांनी फक्त चिमटे काढण्याचेच काम केलं. आपला लहान भाऊ म्हणून उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर थोडा तरी विश्वास दाखवायला हवा होता. थोडा जरी विश्वास दाखवला असता तरी आम्हाला त्यांचे आभार मानण्याची संधी मिळाली असती, असे शर्मिला ठाकरे यांनी म्हटले.
मी माझ्या पुतण्यावर विश्वास दाखवला. मी म्हणाले, आदित्य असं करेल असं मला वाटत नाही. पण तुम्ही ज्या भावाबरोबर लहानाचे मोठे झालात, त्या भावावर थोडा तरी विश्वास दाखवायला हवा होता. तुम्ही संधी मिळेल तेव्हा किणी केसवरून टोमणे मारायचे सोडत नाहीत. त्या भावावर विश्वास दाखवून मदत करायला हवी होती. मग आम्हीही त्यांचे आभार मानले असते, असेही शर्मिला ठाकरे यांनी म्हटले.