मिळालेल्या माहितीनुसार, धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक दत्तात्रय शिंदे यांना शहरातील चाळीसगावरोड चौफुलीजवळील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ एका ट्रकमध्ये आबीद हुसेन शेख (२८) रा. नुर मशिद, ऐंशी फूटी रोड, धुळे हा सरकी आणि फटाक्यांच्या बॉक्स आड सुरत येथे मांजाची तस्करी करणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्या अनुषंगाने एलसीबीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी आपल्या पथकास कारवाईच्या सुचना दिल्या. पथकाने चाळीसगाव रोडवरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ मोहिम राबविली. या कारवाईत आबीद शेख एका ट्रकमध्ये आढळून आला. पोलिसांच्या पथकाने ट्रकची तपासणी केली असता सरकी आणि फटाक्यांच्या बॉक्समागे गोण्यांमध्ये गांजा भरलेला आढळून आला.
यावेळी पोलिसांनी सदर गांज्याची मोजमाप केली असता तो २० हजार १३५ कि.ग्रॅ. एवढा भरला. त्याची किंमत ५ लाख १ हजार ३७५ रूपये एवढी आहे. या कारवाईत ५ लाख १ हजार ३०५ रूपये किंमतीचा गांजा, १२ लाख रूपये किमतीचे वाहन, ३ लाख ३७ हजार ८६९ रूपये किंमतीची सरकी व अडीच लाख रूपये किंमतीचे फटाक्यांचे १५३ बॉक्स असा एकूण २२ लाख ८९ हजार २४४ रूपयांचा मुद्देमाल धुळे पोलीस पथकाच्या हाती लागला असून अधिक चौकशीत आबीदने सदरचा गांजा हा गुडू (पुर्ण नाव निष्पन्न नाही) रा. नूर मशिद, ऐशीफुटी रोड, शिवाजीनगर, धुळे यांचे सांगण्यावरून गुजरात राज्यातील सुरत येथे नेण्यात येणार असल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी धुळे एलसीबीचे कर्मचारी गुणवंत पाटील यांचे फिर्यादीवरून चाळीसगावरोड पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मानवी मनावर परिणाम करणारे पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली धुळे एलसीबीचे निरिक्षक दत्तात्रय शिंदे, सपोनि गणेश फड़, धुळे एलसीबीचे पोसई प्रकाश पाटील, असई संजय पाटील, पोहेकॉ संदीप सरग, सुरेश भालेराव, पोना रविकिरण राठोड, पोकों गुणवंत पाटील, निलेश पोतदार, सुशिल शेंडे, सागर शिर्के, हर्षल चौधरी या एलसीबीच्या पथकाने केली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यावेळी दिली.