• Sat. Sep 21st, 2024
प्रेयसीच्या अंगावर गाडी चढविणारा अश्वजित जामिनावर जेलबाहेर..!

ठाणे : ठाण्यातल्या प्रिया सिंह मारहाण प्रकरणातले आरोपी अश्वजित गायकवाड आणि त्याच्या दोन साथीदारांना ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. ठाणे पोलिसांच्या एसआयटीने रविवारी रात्री उशिरा आरोपींवर अटकेची कारवाई केली होती. आज आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला. प्रक्रियेनंतर न्यायालयाने त्यांचा जामिनही मंजूर केला आहे. दुसरीकडे पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलमे लावताना अतिशय लेचीपेची कलमे लावल्याचा आरोप करत कलम ३०७ आणि कलम ३७६ दाखल करण्यासाठी पीडितेचे वकील मुंबई उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत.

सोशल मीडिया स्टार असलेल्या पीडितेला ११ डिसेंबर रोजी तिचा प्रियकर अश्वजित गायकवाड याने ओवळा येथे भेटायला बोलवले होते. तेथे दोघांमध्ये वाद झाला. या वादातून अश्वजितने तिला शिवीगाळ करून प्रचंड मारहाण केली. तिच्या हाताचाही चावा घेतला. गायकवाड याच्या रोमील पाटील व सागर शेळके या मित्रांनी पीडितेला गाडीने धडक दिल्याचे तिने पोलीस तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने तिच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही समाज माध्यमांवरून टीका सुरु आहे.

ठाण्यात एमएसआरडीसीच्या बड्या अधिकाऱ्याच्या मुलाची प्रेयसीला मारहाण, पायावर रेंज रोव्हर चढवली
पिडीत २४ वर्षीय तरुणीला मारहाण झाल्याचा तसेच कारने ठोकरल्याचा प्रकार ११ डिसेंबर रोजी घडला असून तिच्या तक्रारीनंतर तिचा प्रियकर अश्वजित गायकवाड याच्यासह त्याचा मित्र रोमिल पाटील आणि कारचालक सागर शेळके यांच्याविरुद्ध कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. अश्वजित हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांचा मुलगा असून गुन्हा दाखल होऊनही अश्वजितसह अन्य आरोपींना पोलिसांनी अटक केली नाही. परंतु, या गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी पोलिस आयुक्त जयजित सिंह यांनी एसआयटीची स्थापना करताच सात दिवसांनी रविवारी रात्री तिघा आरोपींना कासारवडवली पोलिसांनी अटक केली. सोमवारी दुपारी आरोपींना पोलिस बंदोबस्तात ठाणे न्यायालयात आणण्यात आले होते. न्यायाधीश प्रियांका धुमाळ यांच्या न्यायालयात संध्याकाळी सुनावणी सुरु झाली. यावेळी पोलिसांनी न्यायालयात म्हणणे मांडत आरोपींना पाच दिवासांची पोलिस कोठडी देण्याची मागणी केली.

तर, पिडीत तरुणीचे वकिल बाबा शेख यांनी न्यायालयात बाजू मांडताना सध्या तरुणी रुग्णायलयात उपचार घेत असून एफआयआर योग्य प्रकारे घेण्यात आला नाही. भादंवि कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल होणे आवश्यक होते. मात्र, गुन्ह्यात जामिनपात्र कलमे लावण्यात आल्याचा असा युक्तीवाद शेख यांनी केला. यावेळी पिडीत तरुणीची बहिणही न्यायालयात हजर होती. नंतर अश्वजित गायकवाड याचे वकील अॅड. राजन साळुंखे यांनी तर अन्य दोन आरोपींच्या वकीलांनी न्यायालयात बाजू मांडली. हा गुन्हा जामिनपात्र असल्याने आरोपींना जामिन देण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी सरकारी वकिलांनी न्यायालयात म्हणणे मांडले. सर्वांचे म्हणणे ऐकून घेत न्या. धुमाळ यांनी तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर लगेच आरोपींच्या वकीलांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. अर्जावर थोड्यावेळानंतर सुनावणी झाली. न्यायाधीशांनी तिन्ही आरोपींना १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामिन मंजूर केला.

प्रिया सिंह प्रकरणात ठाणे पोलिसांची मोठी कारवाई, अखेर अश्वजित गायकवाडला बेड्या

दबावामुळेच जामिनपात्र कलमांचा समावेश

या गुन्ह्यात सर्व जामिनपात्र कलम लावण्यात आले असून जे आवश्यक कलम हवी होती ती लावण्यात आली नाहीत. पोलिस दबावाखाली काम करत असल्यामुळेच पोलिसांनी जामिनपात्र कलमे लावली आहेत. जामिनपात्र कलमे लावून पोलिस आरोपींची पोलिस कोठडी मागत आहेत. हे खूपच हास्यास्पद असून कलमे जामिनपात्र आहेत तर आरोपींची पोलिस कोठडी मागण्याचा प्रश्नच येत नाही- अॅड. बाबा शेख
पोलिसांनी न्यायालयात आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी केली होती. परंतु, गुन्ह्याचे स्वरुप पाहता तसेच हा गुन्हा जामिनपात्र असल्याने तपासामध्ये सहकार्य करणे तसेच अन्य अटींवर आरोपींना १५ हजारांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने जामिन मंजूर केला. तपासाधीन असलेल्या या गुन्ह्याबाबत फार भाष्य करणे योग्य नसून ज्यावेळी गुन्हा घडला तेव्हा अश्वजीत गाडीमध्ये हजर नव्हता. ही केस अपघाती आहे. आरोपींवरील सर्व आरोप आम्ही नाकारले असल्याचे माध्यमांशी संवाद साधताना अॅड. राजन साळुंखे यांनी सांगितले.

आरोपींच्या ट्विटनंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं ट्विटवरून गृहखात्यावर टीकास्त्र

एखाद्या स्त्रीच्या जीवावर उठणे आणि बेदरकारपणे गाडी चालवणे, यात खूप फरक आहे. हा फरक बहुदा राज्याच्या गृह खात्याला कळत नसावा. बेदरकारपणे गाडी चालवून मुद्दाम त्या व्यक्तीच्या जीवाला धोक्यात आणणे यासाठी आपल्या कायद्यात ‘कलम ३०७’ ची तरतूद आहे. मुख्यमंत्रांच्या ठाण्यातील कासारवाडी प्रकरणात हे कलम न लावता एक दिवसात आरोपीला जामीन ‘मिळवून’ देणे हेच दर्शवते की आपल्या राज्यात स्त्रियांचा जीव स्वस्त झाला आहे.

जीवे मारण्याचा प्रयत्न तर करायचा आणि त्या स्त्रीचे चारित्र्य हनन देखील करायचे अधिकार आरोपींना गृहखात्याने दिले आहेत का? उत्तर तर द्यावे लागेल गृहमंत्री महोदय… मुख्यमंत्र्यांच्या गावात महिलांची ही अवस्था असेल तर राज्यात महिलांना हे काय न्याय देणार?

IAS अधिकाऱ्याच्या मुलाने प्रेयसीच्या अंगावर घातली गाडी, आरोपीला बेड्या, आत्तापर्यंत नेमकं काय काय घडलं?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed