श्वेता बर्वे (वय २२) असे या तरुणीचे नाव आहे. सुरुवातीपासूनच ‘आर्ट आणि क्राफ्ट’ची तिला आवड होती. त्यामुळे आपल्या बागेत फुकट जाणाऱ्या सुपारी झाडावरील विऱ्यापासून उत्तम पर्यावरण पूरक चप्पल तयार करण्याची कल्पना तिला सुचली. त्यादृष्टीने प्रयत्न करून तिने पर्यावरणपूरक चप्पलही तयार केली.
विशेष म्हणजे, या कलानिर्मितीसाठी तिला ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे मार्गदर्शन लाभल्याचे श्वेताने सांगितले. आता लवकरच कोकणात दोडामार्ग येथे ती या चपलांचा उद्योग उभारणार आहे. मार्चपासून हा उद्योग सुरू होईल. यासाठी श्वेताला पंतप्रधान महिला उद्योजिक या योजने अंतर्गत अर्थसाह्य मिळाले आहे. यातून रोजगार निर्माण होणार आहे. सुमारे ३०० रुपयांपासून ही चप्पल बाजारात उपलब्ध होणार असल्याचे श्वेता सांगते. त्याचवेळी कोकणातल्या सुपारीच्या बागेत फुकट जाणाऱ्या विरीलाही आता महत्त्व प्राप्त होणार असून, विरीला प्रत्येकी दोन रुपयेप्रमाणे दर मिळणार आहे, असेही ती सांगते.
दरम्यान, या चप्पलनिर्मितीसाठी पुण्यातील बाणेर येथे एका कार्यक्रमात सुप्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.
सुपारी बागायतदारांनी आपल्या बागेतील सुपारीच्या विऱ्या एकत्र करून ठेवाव्यात. या विऱ्यांना योग्य तो मोबदला देऊन नेण्याची व्यवस्था श्वेताच्या उद्योगाकडून केली जाणार आहे. यासाठी कोकणातील बागायतदारांनी आपल्याला सहकार्य करावे, असे आवाहनही श्वेताने केले आहे. त्यामुळे या नवीन उद्योगातून सुपारी बागायतदारांना आर्थिक उत्पन्नाचा नवा स्रोतही निर्माण होणार आहे.
श्वेताच्या आई-वडिलांचा सुपारी, नारळ, आंबा बागायत हा मुख्य व्यवसाय आहे. कोकणातील सुपारी झाडापासून मिळणाऱ्या विऱ्या त्यांचा उपयोग केवळ टाकाऊ किंवा जळण म्हणूनच होत आला आहे. सन २०१९मध्ये करोनाच्या पहिल्या लॉकडाऊनच्या काळात सहज प्रयोग करत श्वेताने स्वतःसाठी या प्रकारची चप्पल बनवली. ही आगळीवेगळी असलेली चप्पल अनेकांच्या पसंतीही उतरली. त्यानंतर अशा स्वरूपाच्या चपला तिने अनेकांना अगदी अल्प काळात घरगुती स्वरूपात बनवून दिल्या. या कृषीपूरक कलानिर्मितीला उद्योगाचा दर्जा मिळेल, असे कधीही वाटले नव्हते, पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे एका कार्यक्रमात डॉ. माशेलकर यांच्या चमूमधील शास्त्री सरांनी माझी ही कलानिर्मिती पाहिली आणि तिथूनच माझ्या संशोधनाला पाठबळ मिळाले. मला चांगली माणसे भेटत गेली आणि पेटंटही मिळाले. यासाठी मला अनेकांचे मार्गदर्शन लाभले, असे श्वेताने ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले.