• Mon. Nov 25th, 2024

    श्वान प्रशिक्षण केंद्र बारामतीत; गोजुबावी गावात ७ हेक्टरवर अद्ययावत केंद्र उभारणीस सरकारची मान्यता

    श्वान प्रशिक्षण केंद्र बारामतीत; गोजुबावी गावात ७ हेक्टरवर अद्ययावत केंद्र उभारणीस सरकारची मान्यता

    संतराम घुमटकर,बारामती : पुणे येथील सध्याच्या श्वान प्रशिक्षण केंद्राची इमारत बांधकाम मोडकळीस आली आहे. येथील जागा अपुरी असून, ही जागा श्वान, श्वान हस्तक, श्वान प्रशिक्षक यांना प्रशिक्षण देण्यासाठी गैरसोयीची ठरत आहे. त्यामुळे राज्य सरकारने सर्व सोयीयुक्त, अद्ययावत ‘श्वान प्रशिक्षण केंद्र’ बारामतीतील गोजुबावी येथे सात हेक्टरवर उभारण्यास नुकतीच मान्यता दिली आहे.

    सध्या शिवाजीनगरमध्ये

    अपर पोलिस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग यांच्या अधिपत्याखाली असलेले राज्य स्तरावरील श्वान प्रशिक्षण केंद्र सध्या पुणे शहर पोलिस मुख्यालय, शिवाजीनगर येथे कार्यरत आहे. या प्रशिक्षण केंद्राची स्थापना सन १९६४मध्ये झाली. राज्य स्तरावरील श्वान प्रशिक्षण केंद्रात राज्य पोलिस दलातील पोलिस आयुक्त / पोलिस अधीक्षक घटकांतील श्वानांना गुन्हे शोधक, बॉम्ब शोधक, अमली पदार्थ शोधक अशा प्रकारच्या कामांसाठीचे प्रशिक्षण श्वान हस्तकांना (पोलिस अंमलदारांना) देण्यात येत आहे.

    पुण्यातील जागा अपुरी

    राज्य पोलिस दलातील श्वान पथक व ‘बीडीडीएस’ पथकातील श्वानांचा विचार करता पुण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाचे श्वान प्रशिक्षण केंद्राची उपलब्ध जागा सध्या अपुरी पडत आहे. त्यामुळे त्यांना बाहेरील राज्यांतील श्वान प्रशिक्षण केंद्रामध्ये पाठवावे लागते.

    ५६ कोटींची मान्यता

    राज्यात श्वान प्रशिक्षणाची वाढीव क्षमता निर्माण होण्याच्या अनुषंगाने ६५ केनलचे, ५० श्वान प्रशिक्षण क्षमतेचे सुसज्ज आणि अद्ययावत श्वान प्रशिक्षण केंद्राची उभारणी बारामतीत करण्यात येणार आहे. त्यासाठी पदनिर्मिती व त्या अनुषंगाने ५६ कोटी ७६ लाख १६ हजार ४४० रुपयांच्या खर्चास सरकारने मान्यता दिली असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी ‘मटा’ला दिली.
    राज्याची चिंता वाढवणारी बातमी! डेंग्यू रुग्णसंख्येत महाराष्ट्र देशात दुसरे, सर्वाधिक रुग्ण मुंबईत
    दृष्टिक्षेपात श्वान प्रशिक्षण केंद्र

    सात हेक्टर १० आर जागेचा वापर.
    बाह्ययंत्रणेद्वारे केंद्रासाठी नव्याने वर्ग-४ची एकूण १८ पदे.
    पशुवैद्यकीय अधिकारी व पशुवैद्यकीय मदतनीस अशी प्रत्येकी दोन पदे नव्याने भरणार.
    श्वान प्रशिक्षण केंद्रासाठी बांधकाम, साधनसामग्रीसाठी बाह्ययंत्रणेद्वारे पदे भरणार.
    एकाच वेळी ५० श्वानांना प्रशिक्षण देण्याची सुविधा.
    भविष्यात गरजेनुसार वन विभाग, उत्पादन शुल्क, कारागृह, ‘एसडीआरएफ’ अशा संस्थाही त्यांच्या श्वानांना प्रशिक्षण देऊ शकणार.

    श्वान पथक हे पोलिसांच्या तपास यंत्रणेतील अविभाज्य घटक आहे. राज्यातील अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र बारामतीत होत आहे. श्वान प्रशिक्षण केंद्राची राज्यात गरज होती.- अंकित गोयल, पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण

    श्वान पथकातील श्वानांची वर्गवारी
    बीडीडीएस पथक १२०
    गुन्हे शोधक १०२
    बॉम्ब शोधक ७४
    अमली पदार्थ शोधक ४५
    गार्ड ड्युटी ५
    पेट्रोलिंग ४
    एकूण ३५०

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *