• Tue. Nov 26th, 2024

    नागपूर वेगाने वाढणारे ‘बिझनेस सेंटर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    ByMH LIVE NEWS

    Dec 16, 2023
    नागपूर वेगाने वाढणारे ‘बिझनेस सेंटर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    २३० कोटीची गुंतवणूक, ३ हजार रोजगार

    नागपूर, दि.१६ : मिहान नागपूरचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. येथे उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्याने उद्योजकांचे पसंतीचे ठिकाण ठरले आहे. इन्फोसिससारख्या जागतिक किर्तीच्या अनेक कंपन्या येथे उभ्या राहात आहेत. त्यामुळे नागपूर हे वेगाने वाढणारे ‘बिझनेस सेंटर’ असून शहराची हळूहळू आयटी हबच्या दिशेने वाटचाल सुरु आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

    जागतिक कीर्तीची आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसच्या नागपूर विकास केंद्राचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. खा.कृपाल तुमाने, इन्फोसिसचे मुख्य वित्तीय अधिकारी नीलांजन रॅाय, कार्यकारी उपाध्यक्ष सुनीलकुमार धानेश्वर, वरिष्ठ उपाध्यक्ष तरंग पुराणिक, उपाध्यक्ष नीलाद्री प्रसाद मिश्रा यावेळी उपस्थित होते.

    नागपूर येथे उभे राहिलेले इन्फोसिसचे हे मी आतापर्यंत पाहिलेल्या केंद्रांपैकी अतिशय चांगले केंद्र आहे. या ठिकाणी ३ हजार रोजगार उपलब्ध होणार आहे. केंद्राने आपला विस्तार करून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण केल्या पाहिजे. नागपूर, विदर्भातील युवकांना संधी दिल्यास केंद्राचा व्याप गतीने वाढेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी व्यक्त केला.

    देशाने ५ ट्रिलीयन डॅालर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी महाराष्ट्राचा प्रमुख पुढाकार राहणार आहे. डिजिटल वापरात भारत जगाचे नेतृत्व करतो आहे. आज भाजीपाला विक्रेते देखील डिजिटल व्यवहार करताना आपण पाहतो. माहिती तंत्रज्ञानाच्या यशस्वी वापरात भारताने 30 वर्षाचा टप्पा गाठला. या तंत्रज्ञानाचे महत्व नागरिकांना समजले आहे. विकासात तंत्रज्ञानाचे महत्वाचे योगदान आहे. भारतासारख्या देशात केवळ तंत्रज्ञानामुळे विकास शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला आहे, असे श्री.फडणवीस म्हणाले.

    यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले की, देशाचा आर्थिक विकास वेगाने होत आहे. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न आपण बाळगले आहे. त्यासाठी इन्फोसिस सारख्या कंपन्यांचे योगदान महत्त्वाचे असणार आहे. मिहानमध्ये उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा आपण निर्माण केल्या. पाणी, रस्ते, पुल, मेट्रोचे चांगले नेटवर्क तयार केले आहे. नागपुरात उत्तम दर्जाचे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ आपण लवकरच उभे करू. पुढील तीन वर्षात नागपुरात अतिरिक्त 1 लाख रोजगार निर्माण होईल, असे श्री.गडकरी म्हणाले. इन्फोसिसला भविष्यात लागणाऱ्या बाबींसाठी सहकार्य करू असेही त्यांनी सांगितले.

    सुरुवातीस उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस व केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी फित कापून केंद्राचे उद्घाटन केले. केंद्राच्या परिसरात वृक्षारोपन केले. प्रास्ताविकात इन्फोसिसचे मुख्य वित्तीय अधिकारी नीलांजन रॅाय यांनी केंद्राच्या स्थापनेची माहिती दिली. आभार वरिष्ठ् उपाध्यक्ष तरंग पुराणिक यांनी मानले.

    नागपूर हे इन्फोसिसचे राज्यातील तिसरे केंद्र

    इन्फोसिस ही जागतिक कीर्तीची आयटी कंपनी आहे. पुणे व मुंबईनंतर नागपूर येथे सुरु झालेले इन्फोसिसचे हे महाराष्ट्रातील तिसरे केंद्र आहे. 230 कोटीची गुंतवणूक या केंद्रासाठी करण्यात आली असून येथे 3 हजार रोजगार उपलब्ध होणार आहे. 2 लाख 65 हजार चौसर फुट जागेवर केंद्राचे बांधकाम करण्यात आले. बांधकामात कला व विज्ञानाचा संयोग करण्यात आला आहे. या केंद्रात युवकांना क्लाउड, एआय आदी अत्याधुनिक तंत्रज्ञानासह दूरसंचार, बॅंकींग, रिटेल, एअरोस्पेस, वाहन, लॅाजिस्टिक, उत्पादन आदी विविध क्षेत्रातील डिजिटल तंत्रज्ञानावर काम करण्याची संधी मिळणार आहे.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed