या मोर्चाची माहिती देण्यासाठी धारावी बचाव आंदोलनातर्फे शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बाबुराव माने यांनी भूमिका जाहीर केली. यावेळी शेकापचे राजेंद्र कोरडे, संजय भालेराव, विठ्ठल पवार, उल्लेश गजाकोश आदी उपस्थित होते. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत ‘फिक्सिंग’ केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मुंबई पोलिस आयुक्तांनी आम्हांला परवानगी दिलेली आहे. टी जंक्शन येथून हा मोर्चा निघणार असून त्यानंतर वांद्रे येथील पताका मैदानात वज्रमूठ सभा होईल, असे माने यांनी सांगितले. या मोर्चात जवळपास एक ते दीड लाख जण सहभागी होणार असल्याचा दावा त्यांनी केला.
आंदोलकांच्या नेमक्या मागण्या काय आहेत, याची माहिती यावेळी देण्यात आली. विविध विकास प्रकल्पांकरिता धारावीबाहेर विस्थापित करण्यात आलेल्या झोपडीधारकांची यादी जाहीर करून त्यांचे धारावीतच पुनर्वसन करण्याची मागणी यात करण्यात आली आहे. त्याशिवाय धारावीतील सर्व झोपडीधारकांचे नव्याने सर्वेक्षण करून सर्वेक्षणाचा शेवटचा पात्रता दिनांक ठरवून सर्व निवासी व अनिवासी झोपडीधारकांना पात्र ठरवावे, या सर्व पात्र निवासी व अनिवासी झोपडीधारकांची यादी जाहीर करावी व त्यानंतरच पुनर्विकासाचे काम सुरू करावे,अशी मागणीही यावेळी करण्यात आली. याशिवाय सर्व निवासी झोपडीधारकांना ५०० चौरच फुटांचे घर मोफत देण्याची मागणी करतानाच मनपा मालमत्ता विभागाच्या चाळी व इमारतीतील रहिवाशांना ७५० चौरस फुटांचे घर मोफत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
पुनर्विकास समितीची उद्धव ठाकरेंवर टीका
दरम्यान, धारावी पुनर्विकास समितीतर्फे पत्रकार परिषद घेऊन या पुनर्विकासाला समितीचे अध्यक्ष रमाकांत गुप्ता यांनी पाठिंबा दिला. महाविकास आघाडीचे सरकार असताना आम्ही प्रत्येक धारावीकरांना ४०० चौरस फुटांचे घर मिळावे अशी मागणी केली होती. त्यावेळेस इथल्या आमदारांनी व खासदारांनी २२५ चौरस फुटांच्या वर घर देता येणार नाही असे निक्षून सांगितले होते. ५०० चौरस फूट मागणीसाठी धारावीच्या पुनर्विकासाला विरोध करणारे उद्धव ठाकरे यांचे मातोश्री १ नंतर मातोश्री २ देखील उभे राहिले, धारावीचा विकास जे बाळासाहेबांचे स्वप्न होते, तो त्यांनी केला नाही किंवा त्यादृष्टीने पावले उचलली नाहीत. धारावीच्या नावावर यांनी फक्त मतांचे राजकारण केले, असा आरोप त्यांनी केला.