• Sat. Sep 21st, 2024

लग्नसमारंभातील जेवणातून वऱ्हाडी मंडळींना विषबाधा; ८० जणांवर उपचार सुरु, चोखरधानीतील घटना

लग्नसमारंभातील जेवणातून वऱ्हाडी मंडळींना विषबाधा; ८० जणांवर उपचार सुरु, चोखरधानीतील घटना

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : अमरावती महामार्गावरील चोखरधानी येथे लग्नसमारंभात अन्नातून तब्बल ८० वऱ्हाड्यांना विषबाधाचा झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कळमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. व्यापारी कैलाश बत्रा (रा. वर्धमाननगर) यांनी ही तक्रार केली.

काय घडलं?

-९ व १० डिसेंबरला बत्रा यांच्या मुलाचा लग्नसमारंभ चोखरधानी येथे होता. ९ डिसेंबरला बत्रा आणि त्यांचे नातेवाइक लग्नस्थळी आले. दुसऱ्या दिवशी दुपारी जेवणानंतर वऱ्हाड्यांना पोटदुखीचा त्रास व्हायला लागला.

-त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. रात्री स्वागतसमारंभादरम्यान जेवण करताना वऱ्हाड्यांना अन्नातून दुर्गंधी यायला लागली. त्यांनी चोखरधानीच्या व्यवस्थापकाकडे तक्रार केली. मात्र, व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष केले. लग्नसमारंभात व्यस्त असल्याने याबाबत बत्रा यांना कळाले नाही.

-मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास सुमारे ८० वऱ्हाड्यांना उलटी व्हायला सुरुवात झाली. बत्रा यांनी त्यांना तत्काळ औषध उपलब्ध करून दिले. ११ डिसेंबरला त्यांनी चोखरधानीचे संचालक धनराज सावलानी यांच्याकडे तक्रार केली. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दुपारी वऱ्हाडी आपापल्या गावी परतले.

-गावी जाताना त्यांची प्रकृती खालावली. समारंभाला आलेल्या सुमारे ८० जणांना विषबाधा झाल्याने बत्रा यांनी मंगळवारी कळमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार देत चोखरधानीचे संचालक पार्वती लक्ष्मी इन्फ्रास्ट्रक्चर, जितू मोहन सावलानी, श्याम सावलानी, मोहन सावलानी, नरेश सावलानी, सोनी सावलानी यांच्याविरुद्ध तक्रार केली.

-बत्रा यांनी विषबाधाप्रकरणी चोकरधानीचे संचालक व व्यवस्थापनाविरोधात तक्रार केली आहे. काही जण वर्धमाननगरमधील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत, अशी माहिती कळमेश्वर पोलिस ठाण्याचे ठाणेदार यशवंत सोलसे यांनी दिली.
भाजप नेत्या सना खान यांचा मृतदेह सापडेना, खुनाच्या चार महिन्यांनीही हायटेक पोलीस अपयशी
दोन पथकांची स्थापना

चोखरधानीतील विषबाधेच्या घटनेची पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणाच्या सखोल तपासाठी दोन पथकांची स्थापना करण्यात आली आहे. एक पथक विषबाधा झालेल्यांचे बयाण नोंदविणार असून, दुसरे पथक वैद्यकीय अहवालचा अभ्यास करणार आहे. याप्रकरणात दोषी आढळल्यास चोखरधानीचे संचालक व व्यवस्थापकाविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed