मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केल्याने छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यात गेल्या दोन महिन्यांपासून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दोघेही महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यात सभा घेऊन एकमेकांवर शाब्दिक हल्ले चढवत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, असं राज्य सरकार सांगत आहे. मात्र मराठा समाजाला कुणबी दाखले दिल्याने भुजबळांच्या टीकेची धार वाढते आहे. त्यामुळे जरांगे पाटील देखील भुजबळांवर टीकेची एकही संधी सोडत नाहीयेत.
तर भाजपसाठी नक्कीच हा चांगला संदेश नाही
संभाजीनगरच्या सभेत बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांना कमी बळ दिलं तर राज्यात दंगली होणार नाहीत. त्यांच्यावर असलेल्या महाराष्ट्र सदनासंबंधीच्या केसेस देखील काढून घेतल्या आहेत. ज्यांनी भ्रष्टाचार करून महाराष्ट्र लुटला त्यांना फडणवीसांची साथ आहे का? असा सवाल विचारून फडणवीसांनी त्यांना समाज देण्याऐवजी बळ देत असतील तर भाजपसाठी नक्कीच हा चांगला संदेश नाही”
भुजबळ देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम करण्याच्या मार्गावर
“भुजबळ देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम करण्याच्या मार्गावर आहेत. त्यांना कुणीही ओबीसी नेता मानत नाही. भुजबळ तुमचा गेम करेल, तुम्ही त्याला सूट देऊ नका. नाराजी ओढून घेऊ नका”, असा इशारा जरांगेंनी फडणवीसांना दिला. त्याचवेळी “भुजबळ धनगर आरक्षणबाबत भूमिका स्पष्ट करत नाही. भुजबळ मुद्दामहून राज्याचं सामाजिक वातावरण खराब करतायेत. स्वातंत्र्य मिळाल्यापासून भुजबळ हे आतापर्यंतचे सर्वांत कलंकित मंत्री आहेत”, अशा शब्दात जरांगे पाटील यांनी तोंडसुख घेतले.
“बीडमध्ये त्यांच्याच पाहुण्यांनी समता परिषदेच्या कार्यकर्त्याचं हॉटेल जाळलं आणि भुजबळ विनाकारण मराठ्यांना बदनाम करत आहेत. ज्यांचं घर जळाले ते साळुंखे, क्षीरसागर बीडमध्ये झालेल्या जाळपोळीला मराठा समाजाला दोषी ठरवत नाहीत. त्यांच्याच पाहुण्यांनी घर जाळलं ते लोक अटक का नाहीत? भुजबळ म्हणतात बीडमध्ये जाळपोळ झाली म्हणून तिथे गेलो. मग अंतरवालीमध्ये घरात कोंडून मारलं तेव्हा कुठे होता? तिथे महिलांचे डोके फुटले होते. तिथे यायला काय रोग आला होता का?” असा संतप्त सवालही त्यांनी विचारला.