Mrinal Tai Gore Flyover: 2019पासून गोरेगाव येथील मृणालताई गोरे उड्डाणपुलाचा विस्तार सुरू आहे. या कामाचा खर्च 2023पासून तीनवेळा वाढला आहे. त्यामुळे या कामावर नगरसेवकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
2019मध्ये कामाला सुरुवात
मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्यातील काम २०१६मध्ये पूर्ण झाले. या पुलामुळे पश्चिमेकडील एस. व्ही रोडवरून पूर्वेला पश्चिम द्रुतगती महामार्गावर पोहोचणे सोपे झाले. यानंतर, या उड्डाणपुलाचे राम मंदिर रोड ते रिलीफ रोडपर्यंत एस. व्ही. रोडलगत विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामाला मार्च २०१९पासून सुरुवात झाली. तेव्हा त्याचा खर्च १९० कोटी रु. होता. नंतर, तो २०९ कोटी रुपयांवर गेला. करोनाकाळात हे काम थांबले. २०२३मध्ये पुन्हा पुलाचा विस्तार करण्याचा प्रस्ताव सादर केला. याचा खर्च २०९ कोटींवरून २४० कोटी रु. करण्यास मान्यता देण्यात आली. आता याच प्रकल्पाची किंमत २४८ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
Mumbai Local: लोकल प्रवास वेगवान होणार! सरकारकडून 4 हजार कोटींची तरतूद; कर्जत-पनवेल मार्ग, कल्याण-बदलापूर, आसनगाव मार्गिकांचे नियोजन
खर्चात वेळोवेळी बदल का?
या खर्चाला स्थायी समिती बैठकीत आक्षेप घेण्यात आला. शिवसेनेच्या नगरसेविका यामिनी जाधव यांनी मार्च २०२३पासून तीनदा खर्च वाढल्याचे सांगितले. ‘नवीन पूल वाहतुकीसाठी पूर्ण खुला केला आहे का हे पाहणे गरजेचे आहे. पाहणी केल्यानंतरच अंदाज येईल,’ असे त्या म्हणाल्या. शिवसेना उबाठाचे यशोधर फणसे यांनीही, प्रकल्पाला आठ-नऊ वर्षे लागलीच कशी, असा प्रश्न करत कामाची पाहणी करण्याची मागणी केली. भाजप नगरसेविका प्रीती सातम यांनी ‘विस्तारित कामाचा आराखडा तसेच रेखाचित्रात बदल करण्यात आले. मग सल्लागाराने चुकीचे नियोजन केले होते का? खर्चात वेळोवेळी बदल झाले. यावरून सल्लागार आणि कंत्राटदारात संगनमत केल्याचे दिसते,’ असा आरोप केला.
Mumbai Water Metro: मुंबईत ‘जल मेट्रो’ प्रकल्पाला वेग, मुख्यमंत्र्यांसमोर अहवाल सादर; तीन टप्प्यांत 340 किमी लांब जलवाहतुकीचे जाळे
सल्लागाराने प्रकल्प किंमतीत वारंवार बदल केल्याचे स्पष्ट दिसते, असे काँग्रेसचे गटनेते अशरफ आजमी यांनीही सांगितले. सर्वपक्षीय सदस्यांनी विस्तारीकरणाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी केली. भाजपचे सभागृह नेते गणेश खणकर यांनीही तीच मागणी केली. स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समितीच्या सदस्यांची भेट होईपर्यंत विषय तहकूब करत असल्याचे सांगितले.
