Dahisar-Andheri Metro: मुंबई मेट्रोच्या दोन मार्गांसाठी उबरद्वारे तिकीट बुकिंग सुविधा उपलब्ध झाली आहे. यावेळी प्रवाशांना मेट्रो तिकीटांवर 50 टक्क्यांची सवलत (10 रुपयांपर्यंत) मिळणार आहे.
70 टक्के प्रवाशांची डिजिटल तिकीटांना पसंती
यापूर्वी केवळ मेट्रो 1 म्हणजे, वर्सोवा-घाटकोपर मार्गासाठी उबरद्वारे तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध होती. परंतु आता यामध्ये मेट्रो 2A आणि मेट्रो 7चाही समावेश करण्यात आला आहे. मेट्रो लाइन 2A दहिसर पूर्व ते डीएन नगरदरम्यान धावते तर मेट्रो 7 दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या मार्गावर धावते. या मार्गावरील तब्बल 70 टक्के प्रवासी सध्या ऑनलाइन पद्धतीने तिकीट बुक करतात. यासाठी ते मुंबई वन ॲप, व्हॉटसॅप किंवा NCMC कार्डचा वापर करतात. त्यामुळे या प्रवाशांसाठी आता आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. शिवाय सवलतीमुळे तिकीट स्वस्त दरात काढतात येणार आहे.
सध्या मुंबई मेट्रो तिकीट बुकिंगसाठी यात्री, इक्सिगो, नवी, ईएमटी, टम्मॉक, ट्रिपोझो, वन तिकीट, ऑटोपे, मॅजिकपिन, चलो,रेडबस, हायवे डिलाइट आणि पेलोकल यासारख्या ONDC-सक्षम ॲपवर तिकीट बुकिंग सेवा आधीपासून उपलब्ध आहे. यामध्ये आता उबरचाही समावेश झाला आहे. यामुळे प्रवाशांसाठी विविध डिजिटल पर्याय उपलब्ध झाले असून ते आपल्या सोयीनुसार आपला आवडता पर्याय निवडू शकतात.
लवकरच सेवेचा विस्तार
सध्या मेट्रोपासून प्रवाशांची लास्ट माइल कनेकटीव्हिटी सुधारण्यावर भर देण्यात येत आहे. यामुळे उबर सारख्या एकाच ॲपवर प्रवाशांना मेट्रो तिकीटांसह रिक्षा, कॅब बुक करून आपल्या पुढील प्रवासाचं नियोजन करता येईल. याशिवाय मेट्रो प्रवाशांसाठी बेस्ट बस सेवा, पादचारी पूल आणि स्थानकांजवल पार्किंगची सुविधा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या उबरद्वारे तिकीट फक्त मेट्रो 1, मेट्रो 2A आणि मेट्रो 7साठी उपलब्ध आहे. पण लवकरच ही सेवा मेट्रो लाइन 9 आणि मेट्रो 2Bवर सुद्धा सुरू करण्यात येणार आहे.
