शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात आतापर्यंत मुंबईत सुरू असलेली उलट तपासणी सध्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमक्ष सुरू आहे. यात मंगळवारी शेवाळे यांची उर्वरित साक्ष नोंदविण्यात आली. उद्धव ठाकरे गटाचे वकील वरिष्ठ अधिवक्ता देवदत्त कामत यांनी यावेळी सामंत यांची उलट तपासणी घेतली. यावेळी कामत त्यांनी शेवाळेंना प्रश्न विचारला की, २०१२ ते २०१८ या काळात पक्षांतर्गत झालेल्या निवडणुका ह्या नियमानुसार झाल्या होत्या का? यावर शेवाळेंनी नकारार्थी उत्तर दिले.
मात्र, तुम्ही स्वत: @Shewale _rahul या ट्विटर हॅन्डलरवरून आदित्य ठाकरे यांची शिवसेना प्रतिनिधी सभेतर्फे युवा सेनेचे प्रमुख म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले का? यावरसुद्धा शेवाळेंनी नकारार्थी उत्तर दिले. परंतु, अॅड. कामत यांनी त्यांना हे २३ जानेवारी २०१८ रोजीचे हे ट्विट दाखविले. यावर आम्ही ठाकरे कुटुंबीयातील प्रत्येकालाच नेता मानत असू त्यामुळे आम्ही त्यांना नेते म्हणून आदर देत असू, असे उत्तर शेवाळेंनी दिले. यावर तुम्ही हे अभिनंदनाचे ट्विट का केले? असा प्रश्न कामत यांनी परत एकदा विचारला, यावर मला आठवत नाही, असे उत्तर शेवाळेंनी दिले.
सत्तांतराच्या घटनाक्रमादरम्यान २१ जून रोजी आपल्यावर हल्ला झाला होता, अशी माहिती यावेळी दिपक केसरकर यांनी दिली. ‘जेव्हा मी माझ्या कारकडे गेलो तेव्हा माझ्या कारवर हल्ला झाला. काही स्थानिक कार्यकर्त्यांनी घेरले आणि कोणीतरी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांनी माझी कार जाऊ दिली. पण माझ्या मागे दोन गाड्या होत्या. त्या गाड्या माझ्या राहत्या घराजवळ पार्क केल्या होत्या. मी अनिल देसाई यांना फोन केला. त्यांना सांगितले की, त्या गाड्या तिथून हटवा. मला सुरक्षित वाटत नाही आणि त्या गाड्या त्याच ठिकाणी राहिल्या तरी मला माझी काम पार पाडताना सुरक्षित वाटणार नाही. मी पत्रकार परिषद बोलावतो आणि त्यांना या घटनेबद्दल सांगतो असे मी देसाईंना सांगितले होते, अशी माहिती यावेळी केसरकरांनी दिली.