नाशिकहून छत्रपती संभाजीनगरकडे चाललेल्या शिवशाहीला बसला चितेगाव फाट्याजवळ आग लागली. इंजिनजवळ धूर निघत असल्याचे चालकाच्या तात्काळ लक्षात आल्याने वेळीच खबरदारी बाळगून प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. त्यामुळे सुदैवाने जीवीतहानी झाली नाही. यापूर्वीही अशा घटना घडल्या असून आग लागण्याची वेगवेगळी कारणे असतात, असे महामंडळातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
रविवारी घडलेल्या घटनेच्या चौकशीसाठी तज्ज्ञांचे पथक तयार केले असून ते आगीत खाक झालेल्या बसची तपासणी करीत आहे. हे पथक महामंडळाच्या मुख्य कार्यालयाकडे घटनांच्या कारणांबद्दलचा अहवाल देणार आहे. नेमके कारण लक्षात आले की अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या या बसमध्ये २९ प्रवाशी प्रवास करीत होते. ही बस छत्रपती संभाजीनगर डेपोची होती.
महामंडळाच्या नाशिक विभागाच्या ताफ्यात ७४ शिवशाही बसेस आहेत. याशिवाय इतर विभागांच्या ताफ्यातील ५६ शिवशाही बसेस देखील नाशिक मार्गावर प्रवाशी वाहतूक करतात. यापूर्वी घडलेल्या बहुतांश घटना या अन्य विभागांच्या शिवशाही बसेबाबत घडल्या आहेत. नाशिक विभागाच्या शिवशाही बसच्या टायरला महामार्ग बस स्थानकात आग लागल्याची एकच घटना आतापर्यंत घडली असल्याचा दावा महामंडळाने केला आहे.
एसटी महामंडळाचे म्हणणे काय?
– प्रवाशांना सेवा देण्यासाठी बाहेर पडणाऱ्या प्रत्येक बसची दररोज तपासणी केली जाते
– त्याशिवाय बस बाहेर काढली जात नसल्याचे अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
– दर दहा दिवसांनी, आणि दर दोन महिन्यांनी देखील बसची देखभाल दुरुस्ती केलीच जाते
– त्यामुळे बसमधील छोटे मोठे दोष दूर करणे शक्य
– ताज्या प्रकरणात बसला आग लागण्याचे प्रासंगिक कारण असण्याची महामंडळाला साशंकता
आगीचे कारण नेमके काय?
आधुनिक बसेसमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिक कनेक्शन अधिक असतात. त्यामुळे वायरींचे जाळेही असते. त्यामुळे विद्युत बिघाड होऊन आग लागू शकते. चालक, वाहकांनी आगीच्या घटनांपासून सावध राहण्यास आणि अशा परिस्थिती उद्भवू शकेल, अशा लक्षणांची तपासणी करून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.