• Mon. Nov 25th, 2024
    काठी नका मारू, थेट गोळीच घाला साहेब; संतप्त शेतकऱ्यांची मागणी, कांदा निर्यातबंदीला जोरदार विरोध

    म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक: पहाटे शपथविधी उरकून सरकार सत्तेवर बसू शकते. रात्री आठ वाजता नोटबंदीची घोषणा होऊ शकते. कांद्याची निर्यातबंदी करून सरकार रात्रीतून शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा टाकू शकते. मग हिच निर्यातबंदी तातडीने मागे का घेऊ शकत नाही? असा संतप्त सवाल उपस्थित करीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अशोकस्तंभ चौकात ठिय्या मांडला. निर्यातबंदी मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. सरकारचे धोरण नक्षलवादी तयार करीत आहे. आम्हाला रोखायचेच असेल तर काठ्या मारू नका. साहेब, थेट गोळीच घाला, अशी मागणी संतप्त आंदोलकांनी पोलिस अधिकाऱ्यांकडे केली. त्यामुळे सुमारे दोन तासांहून अधिक काळ अशोकस्तंभ परिसरात वाहतूक ठप्प झाली.

    केंद्र सरकारने निर्यातबंदी लागू केल्याने कांद्याचे भाव पडले आहेत. अवकाळी पावसाने आधीच कंबरडे मोडले असताना निर्यातबंदीच्या निर्णयामुळे जखमांवर मीठ चोळले गेल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये बळावली आहे. निर्यातबंदीबाबत जाब विचारण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वात चांदवडपासून मोर्चा काढण्यात आला. चांदवडसह देवळा, बागलाण, नांदगाव, निफाडमधील अनेक शेतकरी या मोर्चात सहभागी झाले. डॉ. भारती पवार यांच्या बंगल्याला घेराव घालण्यासाठी सुमारे दोनशे शेतकरी शहरात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. शेतकऱ्यांनी पवार यांच्या निवासस्थानी न जाता जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन द्यावे, या हेतूने पोलिसांनी अशोकस्तंभ चौकातच बॅरिकेडिंग करून मोर्चाला रोखले. यामुळे मोर्चेकरी संतप्त झाले. त्यांनी सरकार आणि डॉ. पवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘आम्ही जगावं की मरावं एवढंच सांगा. जगा म्हणत असाल तर आम्हाला अडवू नका अन्‌ मरा म्हणणार असाल तर आमच्या छाताडात गोळ्या घाला’, अशी उद्विग्नता यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली. आमच्या खिशातील पैसे हिसकावून सरकार दरोडेखोरी करीत आहे. आम्हाला मारून टाकण्यासाठी ही निर्यातबंदी काढली का? असा सवाल निंबाळकर यांनी केला. आम्ही सुरक्षित नसू तर तुम्ही कुणीच सुरक्षित नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जिल्ह्यात नक्षलवाद जन्माला येईल. नक्षलवादाला जन्माला घालण्याचे पुण्याचे काम मी करेन, असा इशारा निंबाळकर यांनी दिला.

    महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला भिडणार, काँग्रेसचा उद्या नागपूर विधानभवनावर ‘हल्लाबोल’ मोर्चा
    मतदानातून मुडदा पाडू!

    निर्यातबंदीचा निर्णय मागे घेतला नाही तर नाफेडच्या अधिकाऱ्याला सोडणार नाही, असा इशारा निंबाळकर यांनी यावेळी दिला. अधिकाऱ्याला मी बघून घेईन पण आपल्या उरावर नाफेडला बसविणाऱ्या पुढाऱ्याचा मुडदा तुम्हाला मतदानातून पाडायचा आहे, असे आवाहन निंबाळकर यांनी शेतकऱ्यांना केले. नाफेडच्या कांदा खरेदीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. या खरेदीत ज्या कंपन्या आहेत त्या केंद्रीय मंत्री डॉ. पवार यांच्याशी संबंधित असल्याचा आरोपही यावेळी आंदोलकांनी केला. नाफेडचे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना जुमानत नाहीत. केंद्रीय मंत्री नाफेडला जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश मानू नका, असे सांगतात. नाफेडच्या कांदा खरेदीतील गैरव्यवहाराची सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) चौकशी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

    डॉ. पवारांनी फोनवर संवाद साधला पण…

    आंदोलकांशी संवाद साधण्यासाठी डॉ. भारती पवार यांचे स्वीय सहायक तसेच जिल्हा उपनिबंधक फयाज मुलानी अशोकस्तंभ येथे आले. डॉ. पवार अधिवेशनानिमित्त दिल्लीत आहेत. त्यामुळे त्यांच्या निवासस्थानी जाण्यापेक्षा आमच्याकडे निवेदन द्या, असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले. आंदोलक ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने त्यांनी निंबाळकर आणि डॉ. भारती पवार यांचे मोबाइलवर बोलणे करून दिले. निर्यात बंदी मागे घ्यावी याकरीता प्रयत्नशील असल्याचे पवार यांनी सांगितले. परंतु, शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी डॉ. पवार यांच्या निवासस्थानी डेरा आंदोलन करण्याचा पवित्रा कायम ठेवला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांशी चर्चा करून आंदोलन थांबविण्याची विनंती करण्यात आली. परंतु, अधिकारी खाली येऊन निवेदन स्वीकारणार असतील तर येऊ, अशी भूमिका घेण्यात आली. अखेर मुलानी यांना निवेदन देऊन हे आंदोलन थांबविण्यात आले.

    शेतकरी म्हणतात…

    – डॉ. पवार मतं मागायला आमच्या बांदापर्यंत आल्या. आता आम्हाला भेटायला तयार नाहीत

    – आम्हाला त्यांचा बंगला बघण्याची हौस नाही. हवं तर त्यांनी इकडे यावं

    – नाफेडपेक्षा ब्रिटीशकालीन व्यवस्था चांगली होती

    – आम्हाला निवासस्थानी येऊ देत नसतील तर खासदारांनी चांदवडमध्ये येऊन राहावं

    शेतकऱ्याकडून १० रुपयाने घेतलेला कांदा पुढे १०० रुपये किलोने आपल्याला मिळतो

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed