• Sat. Sep 21st, 2024
राजर्षी शाहूंच्या कोल्हापुरात नवा पायंडा; विधवा महिलांच्या हातून गृहप्रवेशाचे विधी, निर्णयाचं कौतुक

कोल्हापूर: नव्या वास्तूचा गृहप्रवेश करताना सुवासिनी महिलांना सन्मान देण्याची परंपरागत प्रथा मोडीत काढत कोल्हापुरातील कसबा बावडा येथील रेशनिंग अधिकारी दीपक वावरे यांनी विधवा महिलांच्या हातून बुधवारी गृहप्रवेशाचे विधी करुन राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी कोल्हापुरच्या मातीत नवा पायंडा पाडला आहे. पाच वर्षांपूर्वी विधवा आईचं निधन झालं. आई हयात असती तर तिलाही या समारंभात सहभागी होता आलं नसतं. त्यामुळे विधवांना सन्मान देण्याचा धाडसी निर्णय वावरे कुटुंबीयांनी घेतल्याने त्यांच्या या निर्णयाचं कोल्हापुरात कौतुक होत आहे.
मेगाभरतीसाठी पालिकेची यंत्रणा सज्ज; ८ डिसेंबरपासून लेखी परीक्षेला सुरुवात, ‘अशी’ असणार तयारी
समाजात कोणताही सण समारंभ असेल तर विधवा महिलांना एका कोपऱ्यात स्थान दिलं जातं, हळदी- कुंकू, मान- सन्मान यापासून या महिला दूरच असतात. मात्र काळानुरूप समाजावर असलेल्या जुन्या रूढी परंपरांचा पगडा कमी होतानाचे सकारात्मक चित्र कोल्हापुरात दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक ठराव करून कोल्हापुरच्या पुरोगामी जिल्ह्यात परंपरागत रूढी परंपरांना मूठमाती देण्याचा प्रयत्न केला आहे. नव्या वास्तूचा गृहप्रवेश करताना सात सुवासिनीचे पूजन करून त्यांना जेवण वाढल्यानंतरच नव्या वास्तूत पंगत पडते.

ही परंपरा गेली अनेक वर्ष सुरू आहे. याला फाटा देत कसबा बावडा येथील वावरे कुटुंबीयांनी गृहप्रवेश करताना सुहासिनी ऐवजी विधवा महिलांना मानसन्मान देऊन त्यांचं पूजन करत समाजाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. कसबा बावडा येथील धनगर गल्लीत राहणाऱ्या दीपक वावरे यांची आई उमा वावरे यांचं पाच वर्षांपूर्वी निधन झालं. यानंतर आईच्या स्वप्नातील घर साकारलेल्या दीपक वावरे यांनी नव्या घराचा गृहप्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुवासिनी वाढल्या जाव्या अशी प्रथा आहे, अशी माहिती त्यांना नातेवाईकांकडून मिळाली. मात्र माझी आई जिवंत असतील तर तिलाही यापासून दूरच राहावं लागलं असतं, असा विचार दीपक यांच्या मनात आला. त्यांनी सुहासिनी ऐवजी विधवा महिलांना सन्मान देण्याचा निर्णय घेतला आणि याला कुटुंबीयांनी पाठबळ दिलं.

मराठ्यांना ओबीसीत घेण्यास पाठिंबा दर्शवा, मग सन्मानाने बोलतो; मनोज जरांगेंचं छगन भुजबळांना आव्हान

ज्यांच्या सोबत सात जन्म सोबत राहण्याची स्वप्न बघितली होती. त्यांचीच साथ सुटल्याने या दुःखातून सावरताना अनेक अडचणींना विधवा महिलांना सामोरे जावं लागतं. त्यात घर आणि मुलाबाळांची जबाबदारी झेलत या महिला येणारा दिवस जगत असतात. मात्र समाजही या महिलांना मानसन्मान देण्यात कुठेतरी कमी पडतो, अशी खंत प्रत्येक विधवा महिलेला वाटते. मात्र वावरे कुटुंबीयांनी गृहप्रवेशाच्या वेळी दिलेल्या सन्मानामुळे उपस्थित असलेल्या अनेक विधवा महिलांना अश्रू अनावर झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed