मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकार आणि इतरांनी सादर केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे. त्यावर बोलताना भुजबळ म्हणाले, आता त्याचा काहीही फायदा होणार नाही. कारण, सर्व मराठा लोक कुणबी होत आहेत. त्यामुळे आता बाहेर कोणीच राहणार नाहीये. मागासवर्ग आयोगातील सर्व लोक राजीनामा देत आहेत. कारण आता ओबीसीचा आयोग राहिलेला नाही तर मराठा आयोग झाला आहे, अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली.
महाराष्ट्रात मराठाच राहणार नाहीत. त्यामुळे आता विधिमंडळात ओबीसींच्या मुद्द्यांवर चर्चेची आवश्यकताच नाही. कारण सर्व मराठा समाजाचे लोक कुणबी प्रमाणपत्र घेतायेत. त्यामुळे सर्वजण कुणबी होत आहेत तर कितीही क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करा किंवा विधिमंडळात नवे बिल आणा, मात्र मराठे जर ओबीसीत येत असतील तर बाहेर कोण राहणार? असा कळीचा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला.
हरिभाऊ राठोड ओबीसीमध्ये फूट पाडण्यासाठी कित्येक वर्ष प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे जरांगे पाटील यांना कुणीतरी उंचीवर नेऊन ठेवत आहे. सगळं त्यांना पाहिजे त्याप्रमाणे होत आहे. मला जरांगे यांच्या बोलण्याला किंमत द्यायची गरज वाटत नाही. परंतु समितीचे न्यायमूर्ती शिंदे गावागावात जाऊन तुम्ही हे करा, असे पुरावे द्या असे सांगत आहेत. कुठे दादागिरी करून तर कुठे काय काय करून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत आहेत, असा संताप भुजबळांनी व्यक्त केला.