• Mon. Nov 25th, 2024

    दिग्गजांकडून कौतुक, लाखोंना स्फूर्ती, ऐरोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची वैशिष्ट्ये जाणून घ्या

    दिग्गजांकडून कौतुक, लाखोंना स्फूर्ती, ऐरोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची वैशिष्ट्ये जाणून घ्या

    म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेचे ऐरोली सेक्टर-१५, येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे अल्पावधीतच देशातील अत्यंत आगळेवेगळे स्मारक म्हणून सर्वत्र नावाजले जाऊ लागले आहे. ५ डिसेंबर, २०२३ रोजी या स्मारकाला दोन वर्षे पूर्ण होत असून या दोन वर्षांत या स्मारकाला दोन लाख एक हजारांहून अधिक नागरिकांनी भेट देऊन अभिनव स्मारक म्हणून त्याची प्रशंसा केली आहे.

    स्मारकाला भेटी देणाऱ्या नामांकित विचारवंत, साहित्यिक, व्याख्यात्यांनी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी ‘ज्ञान हीच शक्ती’ या बाबासाहेबांच्या विचार प्रणालीवर आधारित हे ज्ञानस्मारक असल्याचे अभिप्राय नोंदविलेले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या तसेच त्यांच्या चरित्रावर व विचांरावर आधारित पुस्तकांप्रमाणेच येथे आंबेडकरी विचारधारा तसेच महनीय व्यक्तिमत्त्वांवरील पाच हजारांहून अधिक पुस्तकांनी समृद्ध ग्रंथालय असून त्यामध्ये ऑडिओ व्हिज्युअल सुविधांनी परिपूर्ण ई-लायब्ररी आहे. या ग्रंथालयातून अभ्यासक व वाचकांना विचारांचा खजिना विनामूल्य उपलब्ध आहे.

    मुंबईतील पाच वॉर्डात पाणीकपात करण्याचा BMC चा निर्णय, कोणत्या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार?
    बाबासाहेबांचे जीवनचरित्र दुर्मिळ छायाचित्रांतून मांडणारे विशेष दालन हे स्मारकाचे आकर्षण असून या माध्यमातून बाबासाहेबांचा जीवनप्रवास उलगडतो. येथे असलेल्या आभासी चलचित्र प्रणालीद्वारे बाबासाहेबांचे प्रत्यक्ष भाषण ऐकण्याची होलोग्राफिक प्रेझेंटेशन शोच्या माध्यमातून मिळणारी सुसंधी भारावून टाकते, अशी भावना तेथे भेट देणाऱ्या प्रत्येकाने वेळोवेळी व्यक्त केल्या आहेत.

    एकाच वेळी २०० व्यक्ती ध्यान करू शकतील असे भव्य ध्यान केंद्र तसेच २५० आसन क्षमतेचे वातानुकुलीत प्रशस्त सभागृह अशा उत्तम दर्जाच्या विविध सुविधा स्मारकामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. ऐरोली-मुलुंड पुलावरून नवी मुंबईत प्रवेश करताना लांबूनच नजरेस भरणारा ५० मीटर उंचीचा भव्य डोम बाबासाहेबांच्या ज्ञानसंपन्नतेचे प्रतीक म्हणून पेनच्या निबच्या आकाराचा करण्यात आलेला आहे.

    विचारवेध ही व्याख्यान शृंखला स्मारकाच्याअंतर्गत आयोजित करण्यात येत असून या माध्यमातून विचारांचा जागर करण्यात येतो. इतर शहरांमध्ये व्याख्यानमालांना उपस्थितीची कमतरता भासत असताना स्मारकातील व्याख्यानांना मात्र श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद लाभत असून त्याचीही विशेष नोंद विविध व्याख्यानमालांमध्ये सहभागी होणाऱ्या मान्यवर व्याख्यात्यांनी जाहीरपणे घेतली आहे.

    एक्सक्यूज मी, जरा बाजूला व्हा! चैत्यभूमीसमोरच्या व्ह्यूईंग डेकवर अस्वच्छता; अजितदादांनी चहलांचे कान टोचले

    समाज माध्यमांचा प्रभावी उपयोग

    व्याख्यात्यांच्या तसेच स्मारकाला भेटी देणाऱ्या देशी-परदेशी नागरिकांच्या माध्यमातून स्मारकाची माहिती देशापरदेशात पोहचत असताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या drambedkarsmark या स्वतंत्र फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, युट्युब अशा सोशल मीडीया पेजला जगभरातून असंख्य नागरिकांचे लाईक्स आणि कमेंट्स प्राप्त होत आहेत.

    मुलांवर ज्ञानसंपादनाचे संस्कार

    या स्मारकाचे वेगळेपण त्याठिकाणी भेटी देणाऱ्या नागरिकांना मनापासून जाणवत असून त्यांच्यामार्फत इतरांपर्यंत या स्मारकाची माहिती पोहचत आहे. त्यांच्या संपर्कातील नागरिकांनी या ठिकाणी भेट द्यावी, असे त्यांच्यामार्फत आवर्जून सांगितले जात आहे. विशेषत्वाने नव्या पिढीमध्ये अर्थात मुलांमध्ये ज्ञान संपादनाचे विचार रुजावेत, याकरिता पालक पुढाकार घेऊन आपल्या मुलांना या स्मारकाची भेट घडवित आहेत. अनेक जण मुंबई दर्शनाच्या सहलीसाठी येताना स्मारकाला आवर्जून भेट देत आहेत.

    चैत्यभूमीवर विशेष स्टॉल

    बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमी, दादर येथे अभिवादन करण्यासाठी देशापरदेशातून येणाऱ्या नागरिकांपर्यंत ऐरोलीतील नवी मुंबई महापालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील विविध सुविधांची माहिती विशेष स्टॉल लावून छायाचित्रांसह आकर्षक रितीने प्रदर्शित करण्यात येणार आहे.

    चैत्यभूमीवर भीमसागर; महापरिनिर्वाण दिनी डाॅ. आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दाखल

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *