• Sat. Sep 21st, 2024

पाणीगळती रोखण्यासाठी सर्व नळजोडण्यांना मीटर बसवा- पालकमंत्री शंभूराज देसाई

ByMH LIVE NEWS

Dec 5, 2023
पाणीगळती रोखण्यासाठी सर्व नळजोडण्यांना मीटर बसवा- पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा, दि.५: शहराची भविष्यातील वाढती लोकसंख्या विचारात घेऊन पाणीपुरवठा योजना, वितरण वाहिन्या आदींचे व्यवस्थापन करण्यासह पाणीगळती रोखण्यासाठी सर्व नळजोडण्यांना मीटर बसविण्याचे नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात सातारा नगर परिषदेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, सातारा नगर परिषद मुख्याधिकारी अभिजित बापट, नगर परिषद प्रशासन अधिकारी पल्लवी पाटील आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले की, यावर्षी धरणांतील पाणीसाठ्याची गंभीर परिस्थिती असून पुढील काळात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. कास तलावात पुरेसे पाणी असले तरी त्याचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे झाले पाहिजे. पाणी गळती होऊ नये यासाठी सर्व शहरात नळजोडण्यांना मीटर बसवणे आवश्यक आहे.

शहरात स्वच्छ्ता राखण्यास प्राधान्य द्यावे. त्यासाठी कचरा व्यवस्थापन योग्यरित्या करावे. भुयारी गटार योजना शहराच्या ठराविक भागात न करता संपूर्ण शहर समाविष्ट होईल, अशा प्रकारे राबवावी. त्यासाठी उर्वरित भागाचा प्रस्ताव तातडीने तयार करून सादर करावा, असेही पालकमंत्री म्हणाले.

शहर सौंदर्यीकरण प्रकल्पांचा आढावा घेताना श्री. देसाई म्हणाले, उड्डाण पुलांच्या खालील भागांचे सौंदर्यीकरण करत असताना वृद्ध, बालकांना रस्ता सुरक्षितपणे ओलांडता येईल याचाही विचार करावा.

यावेळी श्री. बापट यांनी सादरीकरण करून नगर परिषदेच्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. कास धरणाची उंची वाढविण्याचे काम झाले असल्यामुळे कास धरणातील पाणी संपूर्ण शहरासाठी येणार आहे. अमृत २.० अंतर्गत जल विद्युत प्रकल्पाचे काम गतीने सुरू आहे, प्रस्तावित कास पाणी पुरवठा योजना, शहर सौंदर्यीकरण, गोडोली तळे खोलीकरण, सौंदर्यीकरण, अजिंक्यतारा रस्ता विकसित करणे आदी प्रकल्पांची माहिती त्यांनी दिली.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed