• Sat. Sep 21st, 2024

Weather News : हिवाळ्याला प्रतीक्षा थंडीची! चक्रीवादळ अन् अवकाळीमुळे फक्त धुके, हुडहुडी नाहीच; वाचा वेदर रिपोर्ट

Weather News : हिवाळ्याला प्रतीक्षा थंडीची! चक्रीवादळ अन् अवकाळीमुळे फक्त धुके, हुडहुडी नाहीच; वाचा वेदर रिपोर्ट

छत्रपती संभाजीनगर : बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या ‘मिचाँग’ चक्रीवादळाचा परिणाम मराठवाड्यातील वातावरणावरही झाला आहे. काही दिवसांपासून पडणारी थंडी गायब झाली असून, सद्यस्थितीत ‘सुपर एल निनो’पर्यंत तापमान पोहोचले असल्यामुळे या वर्षी थंडी कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला. दरम्यान, जानेवारीमध्ये काही प्रमाणात थंडी पडण्याची शक्यता आहे.

फक्त धुके, थंडी नाही

मराठवाड्यात काही दिवसांपासून थंडी पडू लागली होती. मात्र, गेल्या आठवड्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. सुमारे पाच दिवसांनंतर आता अवकाळी पाऊस थांबला आहे. मात्र, त्यानंतर किमान तापमान वाढले असून, थंडी गायब झाली आहे. दर रोज ढगाळ वातावरण असून, धुके पडत आहे. डिसेंबर महिन्यात तापमान सर्वसाधारण राहणार असल्याचेही सांगण्यता आले.

‘मिचाँग’चा परिणाम

‘मिचाँग’ चक्रीवादळामुळे वाढती थंडी घटली आहे. बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या पट्ट्याचे ‘मिचाँग’ चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. वादळ उद्या (पाच डिसेंबर) दक्षिण किनारपट्टी ओलांडणार आहे. त्यामुळे ओडिशा राज्याच्या किनारपट्टी भागात मोठा पाऊस पडणार असल्याचा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे. या चक्रीवादळाचा एकूण वातावरणावर मोठा परिणाम झाला आहे. ‘ऑक्टोबर महिन्यात ‘एल निनो’चे तापमान वाढले होते. सध्या ‘सुपर एल निनो’पर्यंत पोहचले असल्यामुळे थंडी कमी राहणार आहे. परिस्थिती मार्च-एप्रिलपर्यंत पूर्ववत होईल. त्यामुळे उन्हाळा सुसह्य राहील; मात्र हिवाळ्यात थंडी राहणार नाही,’ असे हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.

उबदार कपड्यांची विक्री घटली

वातावरणात पहाटे गारठा असला, तरी दिवसा कडक ऊन आहे. फेब्रुवारीपर्यंत कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता नाही. शहरात तिबेटच्या व्यापाऱ्यांनी गरम कपड्यांची दुकाने मध्यवर्ती बसस्थानक परिसरात लावली आहेत. मात्र, कडाक्याच्या थंडी नसल्यामुळे जेमतेम व्यवसाय झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ३० टक्के विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

रब्बीच्या पिकांना फटका

रब्बी पिकांसाठी थंडी अत्यावश्यक आहे. ज्वारी, हरभरा आणि गहू पिकांच्या वाढीसाठी थंडी पोषक असते. पुरेशी थंडी पडली नसल्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. फळबागांनाही त्याचा फटका बसला आहे. फळगळ आणि कीडीमुळे मोसंबी, डाळिंब फळबागांचे नुकसान झाले आहे.

शहरातील आठवडाभरातील तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

२८ नोव्हेंबर २६.८ १९.०

२९ नोव्हेंबर २८.६ २०.०

३० नोव्हेंबर २८.४ २०.०

१ डिसेंबर २८.२ १९.२

२ डिसेंबर २८.४ २०.४

३ डिसेंबर २९.८ २०.०

४ डिसेंबर २७.० २०.०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed