मंत्री धर्मराव बाबा आत्राम हे गडचिरोलीच्या दौऱ्यावर होते. मुलचेरा तालुक्यातील लगाम येथे आयोजित एका सभेत बीआरएस पक्षाची चांगलीच किल्ली उडविली आहे. त्यांनी म्हटले की, महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर वाहणाऱ्या गोदावरी नदीवर उभारलेल्या मेडिगड्डा-कालेश्वरम धरणाला येथील नागरिकांच्या प्रचंड विरोध असतानाही केसीआर यांनी प्रकल्प उभारला. केवळ महाराष्ट्र्राच्या शेतकऱ्यांनाच नव्हेतर तेलंगाणा राज्यातील गोदावरी नदीकाठच्या विविध गावातील शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा मोठा फटका बसत असून दोन्ही बाजुंनी शेकडो हेकर शेतीचे नुकसान झाले आहे. केसीआरचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून त्याचा प्रचार केला.
ते पुढे म्हणाले की, सरकार कोसळण्याच्या अगोदरच या धरणाच्या तीन पिल्लरला तडे गेले. हा मुद्दा घेऊन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने चांगलाच प्रचार केला. स्वतः राहुल गांधी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. अखेर शेतकऱ्यांनी योग्य वेळी त्यांना त्यांची जागा दाखवली. आता केसीआर यांचा “ड्रीम प्रोजेक्टही गेला अन सरकारही गेले, असं ते म्हणाले. एवढेच नव्हे तर महाराष्ट्रात पाय पसरवू पाहणाऱ्या बीआरएस पक्षाला स्वतःचा राज्य सांभाळता आले नाही. तर महाराष्ट्रात काय तीर मारणार असाही टोला लगावला.
भाजपने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात तीन राज्यात सत्ता काबीज करून तेलंगाणात आठ जागा जिंकले आहे. महाराष्ट्रात महायुती सरकार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोदींच्या मागे डबल इंजिन लागणार आहे. त्यामुळे याठिकाणीही त्यांचा टिकाव लागणार नाही. महाराष्ट्रात यायच्या अगोदरच त्यांची गाडी तेलंगाणा राज्यात पंक्चर झाल्याचा टोला त्यांनी लगावला. मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रात “मिशन ४५” म्हणून काम करणार असून लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकून पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.