लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आमची तयारी सुरू झाली आहे. चार राज्यांतील निवडणुकांनंतर कुठे चुका झाल्या हे आम्ही पाहत आहोत, असे पटोले म्हणाले. ‘ इंडिया’ आघाडी बाबत कोणी काय बोलले याने फरक पडत नाही. काँग्रेस हा बार्गेनिंग न करणारा पक्ष आहे. काँग्रेस सर्वांना बरोबर घेऊन चालली आहे. सर्वांना सोबत घेऊन चालण्याची शिकवण पक्षाने दिली, असं ते म्हणाले.
भाजप विभाजनाचे राजकारण करत आहे
भाजप शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा विपर्यास करून भाजप विभाजनाचे राजकारण करत आहे. आता भाजपचे सरकार येणार आणि वानखेडेवर शपथ घेणार असे कोणी स्वप्न रंगवत असेल तर हे महाराष्ट्र आहे. भाजप महाराष्ट्राचा अजूनही नीट विचार करत नाही. भाजपला महाराष्ट्र लुटायचा आहे. महाराष्ट्राचे सर्व उद्योग गुजरातला न्याय आहेत, महाराष्ट्राला गरीब करणं, शेतकऱ्यांना आत्महत्या करायला प्रवृत्त करणं, अशी प्रवृत्ती भाजपची आहे. ही जे काही स्वप्न रंगवत असेल त्यांच्या स्वप्नांचा चुराडा होईल. महाराष्ट्राच्या निवडणुकीचा निकाल शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांशी निगडित असलेल्या पक्षांच्या बाजूने लागेल, असे पटोले म्हणाले. काँग्रेसचे विघटन होईल, असे दावे केले जात आहेत. आता ही चर्चा थांबवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.