राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाचे अधिवेशन रेल्वेस्थानकानजीकच्या परवाना भवन येथे झाले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी धानोरकर बोलत होत्या. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महिला अध्यक्षा सुषमा भड, कार्याध्यक्ष डॉ. शरयू तायवाडे, उपाध्यक्ष ॲड. रेखा बाराहाते, प्रदेशाध्यक्ष कल्पना मानकर, विनोद गुडधे-पाटील, विदर्भ अध्यक्ष विजया धोटे, शहराध्यक्ष वृंदा ठाकरे, ॲड. समीक्षा गणेशे, रुतिका डाफ, साधना बोरकर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमात ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे, विजय बल्की, प्रेमानंद जोगी यांचा ओबीसी महिला महासंघातर्फे सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात डॉ. बबनराव तायवाडे म्हणाले, ‘आम्हाला संवैधानिक लढाई लढायची आहे, ते अधिकार मिळविण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा जन्म झाला आहे. आरक्षण मिळालेच आहे. पण, ते मिळविण्यासाठी संघटित होऊन संघर्ष करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाला शक्ती देणे हे आपले कर्तव्य आहे. यासाठी ध्येय आणि उद्दिष्ट स्पष्ट असायला हवे. तरच या लढ्याला यश मिळेल.’
अधिवेशनात मान्यवरांनी त्यांचे विचार व्यक्त केले. ‘सुदृढ ओबीसी समाजासाठी सक्षम होणे गरजेचे आहे. कुणाच्याही दडपशाहीला न घाबरता ओबीसी समाजाने अधिकारासाठी संवैधानिक आंदोलनात सहभागी झाले पाहिजे’, असे ॲड. ज्योती ढोकणे यांनी सांगितले. ‘संविधानाच्या समतेची व्यवस्था निर्माण करावी लागेल व ओबीसी महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे’, असे मत संध्या सराडकर यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक ॲड. रेखा बाराहाते, संचालन अरुणा भोंडे यांनी केले. आभार शुभांगी घाटोळे यांनी मानले.