‘डीसीडी’ म्हणडे ‘डोनेशन आफ्टर कार्डियाक डेथ’. राज्यातीली डीसीडी प्रकारचे हे पहिलेच अवयवदान आहे. अशा प्रकारचे प्रत्यारोपण अमेरिका तसेच स्पेनमध्ये गेल्या काही वर्षात झाले आहे. भारतात जीडीआय चंडीगढ आणि आयकेडीआरसी अहमदाबाद येथे डीसीडी प्रकारच्या अवयव प्रत्यारोपणाची सोय आहे. मात्र, महाराष्ट्रात रविवारी नागपुरातील एम्समध्ये अशा प्रकारचे प्रत्यारोपण होऊन नव्या इतिहासाची नोंद झाली.
नागपूरच्या अयोध्या नगर भागात राहणाऱ्या लीना विनोद काकडे या २९ नोव्हेंबर रोजी रस्ते अपघातात जखमी झाल्या होत्या. त्यांना नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचाराठी त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. या महिलेच्या मेंदूलाही मार होता. उपचारांना प्रसिसाद मिळत नसल्याने डॉक्टरांनी मेंदुमृत घोषित करण्याचे ठरविले होते. मात्र, तसे घोषित करण्यापूर्वीच लीना यांची हृदयक्रिया बंद पडून त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता मेंदुमृत नव्हे तर हदयक्रिया बंद पडून मृत्यू झाल्याने त्या पद्धतीचे अवयवदान करायचे होते.
मात्र, एम्स प्रशासनाने तातडीने सर्व निर्णय घेतले व ती प्रक्रिया पूर्ण केली. तज्ज्ञांनी हृदय बंद पडल्याने मृत्यू झाल्याचे घोषित केल्यानंतर पती विनोद तसेच मुलगी मानसी यांचे अवयवदानाविषयी समुपदेशन करण्यात आले. त्यांनी संमती दिल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येऊन झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन सेंटरला (झेडटीसीसी) कळविण्यात आले. या केंद्राच्या सूचनेनुसार ज्यांना अवयव द्यायचे त्यांची नावे निश्चित करण्यात आली. हृदयक्रिया बंद पडून मृत्यू झाल्यास अशा व्यक्तीच्या शरीरातील फक्त यकृत व किडनी यांचेच प्रत्यारोपण करता येते. या महिलेचे यकृत प्रत्यारोपणासाठी सक्षम नव्हते. त्यामुळे एम्समध्येच दाखल असलेल्या २० व ३३ वर्षांच्या पुरुष रुग्णांवर दोन्ही किडन्यांचे प्रत्यारोपण करून त्यांना नवे आयुष्य देण्यात आले.
एम्सचे अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार आणि सहकाऱ्यांनी या प्रत्यारोपणात मोलाची भूमिका बजावली. एम्सतर्फे लीना यांना श्रद्धांजली वाहण्यात येऊन त्यांचे पार्थिव घरी पाठविण्याची नि:शुल्क व्यवस्था करण्यात आली.