विधानसभा निकालावर टिळक भवनमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, चार राज्यातील जनतेने दिलेला कौल काँग्रेस पक्षाला मान्य आहे. काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चारही राज्यात भरपूर मेहनत घेतली होती पण लोकशाहीत जनतेचा कौल सर्वोच्च असतो, तो आम्ही नम्रपणे मान्य करतो.
विधानसभेतील चित्र लोकसभेला राहत नाही
या विधानसभा निवडणुकीत ज्या त्रुटी राहिल्या त्याचा अभ्यास करून लोकसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी करू. विधानसभेतील चित्र लोकसभेला राहत नाही, २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्येही विजयी झाला होता व भाजपाचा मात्र पराभव झाला होता ते चित्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दिसले नाही, त्याप्रमाणे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही आजचे चित्र दिसणार नाही, त्यात बदल होईल व काँग्रेस पक्षाचा मोठा विजय होऊन केंद्रात सत्तेत येईल, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.
देशपातळीवर इंडिया आघाडी मजबूत
भारतीय जनता पक्ष हिंदू-मुस्लीम या दोन धर्मात भांडणे लावून ध्रुवीकरणाचे राजकारण करत आहे. काही राज्यांमध्ये त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला. काँग्रेस अशा पद्धतीचे राजकारण करत नाही. विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काहीही परिणाम होणार नाही. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचे सामाजिक न्यायाचे राज्य आहे. महाराष्ट्रात भाजपाचे विभाजनवादी राजकारण चालणार नाही, राज्यात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. महाविकास आघाडी राज्यात व देशपातळीवर इंडिया आघाडी मजबूत असून आगामी निवडणुकीत जनतेचा विश्वास संपादन करू, असेही नाना पटोले म्हणाले.