• Sat. Sep 21st, 2024
पुणे विद्यापीठात १११ जागांवर प्राध्यापकांची भरती; आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध होणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांच्या २१५ रिक्त पदांपैकी १११ जागांवर पूर्णवेळ प्राध्यापकांची भरती होणार असून, त्यासाठी जाहिरात येत्या आठवड्यात प्रसिद्ध केल्या जाणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पूर्णवेळ प्राध्यापक मिळणार आहेत.

पुणे विद्यापीठात साधारण १२ वर्षांपासून प्राध्यापक भरती न झाल्याने, विविध शैक्षणिक विभागांमध्ये निम्म्यापेक्षा अधिक प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे विद्यापीठात पूर्णवेळ अध्यापन करणाऱ्या प्राध्यापकांची संख्या बोटावर मोजण्याइतकी राहिली आहे. या सर्वांचा परिणाम विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत असून, विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी पुरेशा प्रमाणात प्राध्यापक उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापकांच्या १११ जागा भरण्याची प्रक्रिया सुरू असून, त्या अंतर्गत जाहिरात लवकरच येत्या आठवड्यात प्रसिद्ध केली जाणार आहे. हे प्राध्यापक साधारण पुढील २५ वर्षे विद्यापीठात कार्यरत राहणार आहे. त्यामुळे संपूर्णी प्रक्रिया नियामांच्या अधीन राहून शैक्षणिक गुणवत्तेवर आणि पारदर्शी पद्धतीने राबविण्यात येईल.

– डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने कंत्राटी तत्वावर काही काळासाठी १३३ प्राध्यापकांची भरती प्रक्रिया राबवली. काही दिवसांपूर्वी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठाला १११ रिक्त पदे भरण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार ही पदे भरण्यासाठीची जाहिरात पुणे विद्यापीठाकडून प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याची माहिती विद्यापीठाच्या वेबसाइटवरही मिळेल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या प्रशासनामध्येही काही पदे भरण्यात येणार आहे. त्याबाबतच्या जाहिरातीही लवकरच प्रकाशित केल्या जातील, असे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सेट परीक्षेचे अर्जही सुरू होणार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी सेट परीक्षा ७ एप्रिलला घेण्यात येणार आहे. या परीक्षेची तारीख विद्यापीठाने जाहीर करतांनाच ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याच्या तारखा लवकर प्रसिद्ध करण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार येत्या दोन ते तीन दिवसांत अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed