बंगालच्या उपसागरात तीव्र कमीदाबाच्या पट्ट्याचे आता ‘मिग्जॉम’ या चक्री वादळात रुपांतरण झाले आहे. याचा फटका समुद्र किनारपट्टीवरील राज्यांना तर बसणारच आहे. त्यासोबतच पूर्व विदर्भातील थंडीही काहीशी ‘जाम’ होणार आहे. पूर्व विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून तापमानात थोडीफार वाढ होणार असल्याने अद्याप थंडीला अवकाश आहे.
नागपुरात डिसेंबर महिना हा कडाक्याच्या थंडीचा समजला जातो. मात्र, अद्यापही थंडीची भट्टी जमलेली नाही. बंगालच्या उपसागरातील तीव्र कमीदाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या आठवड्यात विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा फटका बसला होता. आता परत एकदा विदर्भात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील ‘मिग्जॉम’ हे चक्रीवादळ आंध्र प्रदेश व तामीलनाडूच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. यामुळे तयार होणारा हवेतील ओलावा पूर्व विदर्भापर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हवामान खात्यानुसार, चंद्रपूर व गडचिरोली येथे ४ ते ७ डिसेंबर दरम्यान तर नागपूर, वर्धा, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांमध्ये ५ व ६ डिसेंबर रोजी हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
अधिवेशनात थंडावणार नागपूर
यंदाच्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावरून नागपुरातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. मात्र, ७ डिसेंबरनंतर नागपुरातील वातावरणात गारवा वाढण्याची शक्यता आहे. ७ डिसेंबरनंतर नागपुरातील पावसाळी वातावरण संपून कोरडे हवामान सुरू होण्याची शक्यता आहे. या काळाता तापमानात काही अंशांची घसरण होऊन थंडीला सुरुवात होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.