• Tue. Nov 26th, 2024

    महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांच्या सोयी सुविधांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी

    ByMH LIVE NEWS

    Dec 3, 2023
    महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांच्या सोयी सुविधांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी

    मुंबई, दि. 3: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी राज्य शासन आणि मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी चैत्यभूमी येथे जाऊन मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले.

    सकाळी धारावी येथे मुंबई सखोल स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करून मुख्यमंत्री श्री. शिंदे दादर येथील चैत्यभूमीवर आले. देशभरातून येणाऱ्या अनुयायांसाठी करण्यात आलेल्या सुविधांचा आढावा घेतला.

    महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येपासून ते सहा डिसेंबरपर्यंत आलेल्या अनुयायांच्या भोजनाची व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. ज्याठिकाणी भोजनाची सोय करण्यात आली आहे त्याची पाहणी देखील त्यांनी यावेळी केली. आरोग्य व्यवस्था, स्वच्छता यासाठी त्यांनी महापालिका प्रशासनाला सूचना केल्या.

    महानगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क), डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्‍थान ‘राजगृह’ यासह आवश्यक त्या विविध ठिकाणी सुसज्‍ज नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यांच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री शिवाजी पार्क येथे आले होते. यावेळी राज्य आणि देशभरातून आलेल्या अनुयायांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला त्यांच्या निवास आणि भोजनाच्या सुविधेची माहिती घेतली.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी येथील स्मारकाच्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी देशभरातून येणाऱ्या अनुयायांना विश्रांतीसाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे तात्पुरता निवारा, शामियाना उभारण्यात आला आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्पुरत्या निवाऱ्याची सोय म्हणून परिसरातील महानगरपालिकेच्या सहा शाळा निश्चित करण्यात आल्या आहेत. या शाळांमध्ये देखील आवश्यक त्या सर्व नागरी सेवा-सुविधा सुसज्‍ज ठेवण्यात आल्या आहेत.

    यावेळी आमदार सदा सरवणकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, महानगरपालिकेच्या अतिरीक्त आयुक्त अश्विनी भिडे, अतिरीक्त आयुक्त अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे आदी उपस्थित होते.

    000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed