• Sat. Sep 21st, 2024
मी प्रांताध्यक्ष आणि युवक अध्यक्ष यांच्याशी बोलेन… उमेदवारीवर शरद पवार काय म्हणाले?

पुणे : १९७८ साली निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीमध्ये तरुणांना मोठी संधी देऊन आम्ही निवडणूक लढवली व त्यातील साठ उमेदवार निवडून आले. निवडणुका झाल्यानंतर दुसऱ्यांचं सरकार आलं. काही दिवसांसाठी मी परदेशात गेलो होतो. तिथून परत आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की साठ आमदार निवडून आले होते त्यातील सहाच शिल्लक राहिलेत व बाकीचे सगळे अन्य पक्षामध्ये गेले. त्यामुळे साहजिकच होतं की साठवरून सहावर आलो तर इतर लोकांना वाटत होतं की आता हा विचार संपेल. पण हा विचार गांधी व नेहरूंचा विचार होता. हा विचार यशवंतराव चव्हाण यांचा विचार होता. हा विचार फुले- आंबेडकरांचा विचार होता. कोणीही ते संपवू शकत नाही, असा निर्धार व्यक्त करून आपण जनतेमध्ये जाऊन नवीन पिढी तयार करु, असा विश्वास शरद पवार यांनी बोलून दाखवला.

शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यात कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला बोलताना शरद पवार यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपलं मनोगत मांडलं. अजित पवार यांचे दावे खोडून काढताना आपला विचार आणि भूमिका लोकांपर्यंत सक्षमपणे पोहोचवा, असं आव्हान त्यांनी नेते कार्यकर्त्यांना केलं.

ज्यांनी पक्ष घेऊन जाण्याचा विचार केला, त्यांच्या टीकेवर फारसा विचार करण्याची गरज नाही – शरद पवार

पवार म्हणाले, १९७८ नंतर निवडणुका झाल्या. त्यानंतर हे साठ लोक जे पक्ष सोडून गेले होते त्यातील जवळपास ५१ ते ५२ लोकं हे निवडणुकांमध्ये पराभूत झाले. त्याचा अर्थ हाच की लोकांना त्यांचा निर्णय आवडलेला नव्हता. पुन्हा एकदा एक नवीन पिढी आपण उभी करू शकलो आणि नंतरच्या निवडणुकांमध्ये ७६ लोकं निवडून आले आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला आपण एक वेगळी दिशा देऊ शकलो होतो. हे उदाहरण सांगायचं कारण एवढंच की कोणी गेलं तर त्याची चिंता करण्याचं कारण नाही. शेवटी सामान्य लोकांमध्ये आपली भूमिका मांडून त्यांचा पाठिंबा घेण्यासाठी जे यशस्वी झाले, लोक त्यांच्याबरोबर राहत असतात. ती अवस्था नक्की महाराष्ट्रामध्ये या निमित्ताने बघायला मिळाली.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, मी प्रांताध्यक्ष आणि युवक अध्यक्ष यांच्याशी अधिक सविस्तरपणाने बोलणार आहे की, माझ्या मते जे काही घडलं त्याची काही चिंता करण्याचं कारण नाही. त्यामुळे संघटना ही स्वच्छ व्हायला लागली आहे. त्याहीपेक्षा नवीन लोकांना संधी द्यायची ही परिस्थिती आज या ठिकाणी तयार झालेली आहे. जर युवकांची संघटना ही आपण मजबूत करू शकलो तर माझी खात्री आहे की उद्या निवडणुका ज्यावेळेला होतील, त्यावेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसची एक मोठी फळी मोठ्या मताने निवडून जाईल व ते राज्य चालवतील आणि लोकांचे प्रश्न सोडवतील. या प्रकारची स्थिती ही महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे एक मोठी संधी ही तुम्हा सर्वांना मिळाली त्याची नोंद घेऊन या विधानसभेच्या कार्यक्षेत्रात आपला संपर्क कसा वाढेल? प्रत्येक गावामध्ये आपण कसे जाऊ? प्रत्येक गावामध्ये आपल्या कार्यकर्त्यांचा संच कसा उभा राहील? जो काही पक्षाचा विचार आहे तो शेवटच्या माणसापर्यंत आपण कसा पोहोचवू शकू? हे काम आपण चिकाटीने जर केलं तर माझी खात्री आहे की नेतृत्वाची एक मोठी फळी उभं करण्याचं कर्तुत्व हे तुमच्यामध्ये आहे. फक्त त्यासाठी कष्ट केले पाहिजेत, संपर्क वाढवला पाहिजे व संघटना मजबूत केली पाहिजे एवढेच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगायचं आहे.

काल दादा तुला असं बोलले आणि तटकरे तसं बोलले.. अजित दादांचं भर सभेतून कार्यकर्त्यांना विशेष आवाहन

काही लोकांनी नवीन प्रश्न उपस्थित केले, टिप्पणी केली. ज्यांनी पक्ष सोडला ज्यांनी हा पक्ष घेऊन जाण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडून आज तुमच्या-माझ्यावर टीका टिप्पणी होत आहे. त्याचा काही फारसा विचार करण्याचं कारण नाही. त्याचं कारण असं आहे की, त्यांच्या हे ध्यानात येत आहे की, लोकांच्यात गेल्यानंतर लोक उद्याच्याला अनेक गोष्टींचे प्रश्न आपल्याला विचारतील. त्याच्यापासून लक्ष विचलित करायचं असेल तर आपल्यावरच हल्ले करा हे सूत्र घेऊन व एक वेगळा कार्यक्रम घेऊन आपले काही सहकारी मित्र आज वेगळ्या ठिकाणी गेले आहेत, अशा शब्दात त्यांनी अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना उत्तर दिलं.

सत्ता येते व जाते. सत्ता गेल्यानंतर पुन्हा एकदा नव्या उमेदीने पुढे जाण्याची भूमिका घेतली तर सामान्य माणसाचा पाठिंबा मिळतो. शेवटी माणूस हा विचार शोधतो की तुम्ही कोणाच्या तिकिटावर निवडून आलात? तुमचं चिन्ह काय होतं? तुमचा कार्यक्रम काय होता? तुम्ही कुणाचा फोटो वापरला? तुम्ही कोणाचं नेतृत्व स्वीकारलं? आज तुम्ही कुठे गेलेला आहात? या सगळ्या गोष्टींचा विचार हा सामान्य माणूस नेहमी करत असतो. त्यामुळे जोपर्यंत जागरूक सामान्य माणूस हा या देशामध्ये व महाराष्ट्रामध्ये आहे तोपर्यंत परिवर्तन करण्याची धमक ही या समाजामध्ये असेल. त्या परिवर्तनाची तयारी करणं हाच कार्यक्रम घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे त्यादृष्टीने तुम्ही तयारीला लागलं पाहिजे, असं आवाहन पवार यांनी केलं.

पटेल म्हणाले पुस्तक लिहिलं तर मालिका निघेल, शरद पवार म्हणाले मी वाट बघतोय…, काय लिहायचं तेही सांगितलं
लोकसभेची निवडणूक तीन ते चार महिन्यांवर आली आहे. ती निवडणूक संपल्यानंतर विधानसभेची निवडणूक ही पुढच्या आठ ते दहा महिन्यांवर आली आहे. म्हणून जे काही मतदारसंघ पक्षाने ठरवले आहेत त्या प्रत्येक मतदारसंघाची आखणी करून ती जागा आम्ही घेणारच या पध्दतीचे निर्णय घेऊन तुम्ही पुढची पाऊलं टाकली पाहिजेत. एक वेगळ्या प्रकारचे वातावरण जर कोणी तयार करण्याचे प्रयत्न करत असेल तर आम्ही विचारांशी बांधील आहोत, आम्ही संधी साधू नाही ही भूमिका महाराष्ट्राच्या जनतेला व तरुण पिढीला सांगण्याचं ऐतिहासिक काम तुम्ही करा, असं आवाहनही त्यांनी केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed