अकोला जिल्ह्यातील कुरणखेड नदीपात्रात आपल्या सहा वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन एका महिलेनं आत्महत्या केली आहे, अशा माहितीचा फोन बोरगाव मंजू पोलीस स्टेशनला आज दुपारी एक वाजता आला होता. पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात रवाना केले. घटनास्थळाचा पंचनामा केला असता पोलिसांना एक पर्स घटनास्थळी आढळून आली. त्यामध्ये दोघांची ओळखपत्रे होती. त्यातून मृतांची ओळख पटली. अश्विनी या वर्धा इथे ‘केडीएम’ शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. पोलिसांनी घटनास्थळी सुसाईड नोटदेखील आढळून आली आहे.
दोघांची बेपत्ता असल्याची होती पोलिसांत तक्रार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अश्विनी आणि शिवांश हे दोघेही कालपासून बेपत्ता असल्याची तक्रार वर्ध्याच्या रामनगर पोलीस ठाण्यात नमूद होती. अश्विनी ही शिवांशला घेऊन शाळेत जाते म्हणून काल सकाळी घरून निघाली होती. रात्री बराच वेळ झाला तरी मायलेक घरी परतले नाहीत. नातेवाईकांनी इतर ठिकाणी दोघांचाही शोध घेतला. मात्र कुठलाही प्रकारचा सुगावा हाती लागला नाही. अखेर पोलिसात मिसिंग तक्रार नमूद करावी लागली. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार दोघेही आज सकाळी अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर तालुक्यातल्या कुरणखेडला पोहोचले.
कुळदेवीचे दर्शन घेत केली आत्महत्या
अकोला जिल्ह्यातल्या ढगादेवी म्हणून ओळख असलेल्या काटेपूर्णा देवी ‘माँ चंडिका’ ही अश्विनी आष्टाणकर यांची कुळदेवी आहे. त्यामुळ दर्शनासाठी अश्विनी आणि त्यांचा मुलगा शिवांश दोघेही आले होते. दोघांनी मंदिरात देवीचे दर्शन घेतले. त्यानंतरच मंदिराच्या परिसरात असलेल्या काटेपूर्णा नदीत अश्विनीने आपल्या चिमुकल्या सहा वर्ष शिवांशला मिठीत घेऊन नदीत उडी घेतली, असे समजते. दोघांचे मृतदेह दिसताच परिसरातील नागरिकांनी या संदर्भात बोरगाव मंजू पोलिसांना कळवले.
अश्विनीचा झाला होता घटस्फोट
वर्धा येथील महाकालकर कुटुंबातील अश्विनी हिचा विवाह नागपूरच्या निलेश आष्टाणकर याच्यासोबत झाला होता. सुरुवातीला दोघे आनंदाने नांदले. लग्नानंतर त्यांना एक मूल झाले. त्यानंतर सातत्याने दोघांमध्ये छोट्या कारणांवरून वाद व्हायला लागले. या वादाला कंटाळून अश्विनीनं निलेशला घटस्फोट दिला आणि गेल्या सहा मुलासह वर्ध्यात माहेरी राहत होती.
घटस्फोटानंतरही त्रास कायम; सुसाईड नोटमध्ये नमूद
अश्विनीनं आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली. सुसाईड नोटमध्ये तिने आपल्या आत्महत्याला पतीला जबाबदार धरले आहे. घटस्फोटनंतरही निलेशचा प्रचंड त्रास अश्विनीला सहन करावा लागत होता. निलेश असा काय त्रास देत होता की तिला आत्महत्येसारखा निर्णय घ्यावा लागला याचा तपास पोलीस करताहेत. दरम्यान अश्विनी वर्ध्यातून अकोल्यात कशी आली? तिच्यासोबत नेमकं काय घडलंय? याचा तपास सुरू आहे.
अश्विनीनं सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे की ‘मी अश्विनी आष्टणकर माझा घटस्फोट झाल्यानंतरही माझा नवरा मला खूप त्रास देतोय. मी आईकडे राहते. तिथेही मला नीट राहू देत नाही. म्हणून मी सर्व त्रासाला कंटाळून माझ्या मुलासह आत्महत्येचा निर्णय घेतला.’ दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.