• Sat. Sep 21st, 2024
आधी तडकाफडकी बदली, आता पुनर्नियुक्ती, डॉ. विनायक काळे बी. जे. च्या अधिष्ठातापदी

पुणे : बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी पुन्हा डॉ. विनायक काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने बुधवारी या संदर्भातील आदेश काढला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अधिष्ठाता पदावरून सुरू असलेला संभ्रम दूर झाला आहे. मात्र, डॉ. काळे यांनी अद्याप कार्यभार स्वीकारलेला नाही. त्यामुळे सध्या प्रभारी अधिष्ठाता म्हणून डॉ. श्रीनिवास शिंत्रे कार्यभार सांभाळत आहेत.

अधिष्ठाता पदावरून डॉ. विनायक काळे यांची जानेवारी महिन्यात बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी डॉ. संजीव ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, मुदतपूर्व बदली झाल्याने या निर्णयाविरोधात डॉ. काळे यांनी ‘महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण’कडे (मॅट) याचिका दाखल केली होती.

डॉ. विनायक काळे पुन्हा ससूनमध्ये, अधिष्ठातापदी नियुक्ती, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आदेश
यानंतर ‘मॅट’ने १४ जुलै रोजी डॉ. काळे यांच्या बाजूने निकाल दिला होता. या निकालाविरोधात डॉ. ठाकूर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने १० नोव्हेंबरला डॉ. काळे यांच्या बाजूने निर्णय दिला. या दिवाशी ललित पाटील प्रकरणावरून डॉ. ठाकूर यांना पदमुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ११ नोव्हेंबरला डॉ. काळे यांनी अधिष्ठाता पदाचा कार्यभार स्वीकारला होता. मात्र, कार्यभार स्वीकारावा असा आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाकडून त्यांना मिळाला नव्हता. त्यामुळे ११ नोव्हेंबरनंतर ते बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात फिरकलेच नव्हते. त्यामुळे अधिष्ठाता पदावरून संभ्रम निर्माण झाला होता. नियुक्तीचे आदेश गुरुवारी मिळाले. येत्या दोन ते तीन दिवसांत कार्यभार स्वीकारणार असल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले.

राधेश्याम मोपलवार MSRDC च्या जबाबदारीतून मुक्त, लोकसभा निवडणूक लढवणार? राजकीय चर्चांना उधाण
डॉ. काळेंसमोरील आव्हाने

ललित पाटील प्रकरणानंतर येरवडा मध्यवर्ती कारागृहातील काही निवडक कैद्यांना ससून रुग्णालयात दाखल करून त्यांची बडदास्त ठेवण्यात येत असल्याचे समोर आले आहे. कैद्यांना महिनोन् महिने दाखल ठेवण्यासाठी उपचारांचे कागदी घोडे नाचविण्यात आल्याचेही उघडकीस आले आहे. या प्रकरणामुळेच डॉ. संजीव ठाकूर यांना पदमुक्त करण्यात आले असून, डॉ. प्रवीण देवकाते यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणानंतर रुग्णालयातील अंतर्गत वाददेखील समोर आले आहेत. त्यामुळे बी. जे. आणि ससूनची डागाळलेली प्रतिमा उंचावण्याचे आव्हान डॉ. काळे यांच्यासमोर असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed