एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या अधिकाऱ्यांचे पथक बुधवारी सायंकाळी उशिरा राजन बच्चुमल यांच्या सील असलेल्या दुकानात कारवाईसाठी आले होते. या पथकाने बच्चुमल यांच्या दुकानाचे सीलदेखील काढले. या कारवाईची माहिती देण्यात न आल्याने बच्चुमल यांनी कारवाईला विरोध केला. स्थानिक व्यापारी वर्गानेही या वेळी गर्दी केली. बँकेच्या पथकाने तोडलेले सील पुन्हा लावले. व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त करीत या कारवाईचा निषेध केला व ११२ नंबरवर पोलिसांना कळविले.
बीट मार्शल घटनास्थळी दाखल झाल्यावरदेखील ही कारवाई सुरूच होती. त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचा संताप आणखी वाढला. अखेर स्थानिक पोलिसांनी या प्रकाराची दखल घेतली. नाशिकरोड पोलिस ठाण्यात संबंधित पथकाने आपली भूमिका मांडली. मात्र, कारवाई सूर्यास्तापूर्वी होणे आवश्यक होते. तसे न झाल्याने पोलिसांनी बँकेच्या पथकास समज दिली.
पथकाचे मौन
दुकानाचे सील काढून पुढील जप्तीची कारवाई करण्यास आलेल्या बँकेच्या पथकास स्थानिक व्यापाऱ्यांनी त्यांची ओळख, ओळखपत्र, नाव, कारवाईचा आदेश, रात्री कारवाई का करीत आहात, याबाबत विचारणा केली. मात्र, पथकाने मौन बाळगले. त्यामुळे या कारवाईबाबत शंका वाढली. एवढेच काय, चोरी करण्यास आला आहात का, असा सवालही या पथकास विचारण्यात आला, तरी हे पथक मौनातच राहिले.
बँकेने ऑक्टोबरमध्ये दुकानाचा गाळा सील केला होता. त्यानंतर २८ नोव्हेंबर रोजी लिलावदेखील ठेवला. मात्र, लिलावाला प्रतिसाद मिळू शकला नव्हता. त्यांनतर बँकेने कोणतीही नोटीस न देताच बुधवारी सायंकाळी साडेसातला गाळ्याचे सील तोडले. आतील माल नेण्यासाठी वाहनदेखील या पथकाने आणले होते. त्यामुळे मी या कारवाईला विरोध केला. बँकेची अशा प्रकारची कारवाई नियमबाह्य आहे – राजन बच्चुमल, व्यापारी
दुकानाचे सील काढून पुढील कारवाईचे बँकेच्या पथकाचे नियोजन रीतसर आहे. मात्र, पथकाने या कारवाईची माहिती स्थानिक पोलिसांना आगाऊ देणे आवश्यक होते. तसे त्यांनी केले नाही. शिवाय कारवाईच्या वेळेवरही स्थानिक व्यापाऱ्यांनी आक्षेप घेतला. बँकेच्या संबंधित पथकास समज देण्यात आली आहे. – रामदास शेळके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, नाशिकरोड