• Mon. Nov 25th, 2024
    महागाईची चाहूल : खाद्यतेल उत्पादन ३० टक्के तुटीत

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

    देशात महागाईची चिन्हे असतानाच खाद्यतेल उत्पादनात ३० टक्के तुटीची चिन्हे आहेत. देशात तेलबिया पिकांमध्ये काही प्रमाणात वाढ होती, मात्र पेरणीनंतरच्या अनियमित पावसामुळे प्रत्यक्ष उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे दहा दिवसांत किंमतीत २० टक्क्यांची वाढ झाली आहे.

    भारत हा जगातील सर्वाधिक खाद्यतेल वापरकर्ता देश आहे. मात्र भारतात एकूण मागणीच्या ४० ते ४५ टक्केच खाद्यतेल तयार होते. उर्वरित खाद्यतेल आयात केले जाते. एकूण आयातीत जवळपास ६५ टक्के पामतेलाचा समावेश असतो. भारतात तयार होणाऱ्या ४५ टक्के खाद्यतेलात जवळपास २५ टक्के सोयाबीन व त्यापाठोपाठ राइसब्रान आणि भुईमुग यांचा समावेश असतो. या सर्व पार्श्वभूमीवर देशभरात यंदा खरिपातील तेलबिया पेरणी क्षेत्रात दहा वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ०.६९ टक्क्यांची घट झाली असताना सर्वाधिक मागणी असलेल्या सोयाबीन पेरणीत दहा वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ०.९६ टक्के वाढ होती. मागील वर्षीपेक्षाही १.१८ लाख हेक्टरवर सोयाबीनच्या पेरण्या अधिक झाल्याचे राष्ट्रीय खाद्य सुरक्षा मिशनने नमूद केले होते. मात्र आता खाद्यतेलबियांचे प्रत्यक्ष उत्पादन चिंता वाढविणारे आहे.

    केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सांख्यिकीनुसार, देशभरात एकूण नऊ प्रकारच्या खाद्यतेलबियांचे उत्पादन होते. त्यापैकी भुईमुग, एरंडी, तीळ, जवस, सोयाबीन व सूर्यफूल या सहा प्रकारच्या तेलबियांचेच खरिपाच्या हंगामात उत्पादन घेतले जाते. या सहा प्रकारच्या तेलबियांचे मागील वर्षीच्या खरिप हंगामात २६१.५० लाख टन उत्पादन होते. यंदा २८३.७० लाख टनाचे लक्ष्य केंद्रीय कृषी मंत्रालयाने निश्चित केले होते. मात्र त्या तुलनेत यंदा फक्त २१५.३३ लाख टन उत्पादन होण्याची चिन्हे आहेत.

    याबाबत अखिल भारतीय खाद्यतेल महासंघाचे अध्यक्ष शंकर ठक्कर यांच्याशी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने चर्चा केली असता त्यांनी सांगितले, ‘मलेशियाने अचानक पामतेलाचे उत्पादन कमी केले आहे. त्याचा आयातीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे पामतेलाचे घाऊक दर १५ दिवसांत ८२ रुपयांवरून ८५ रुपये, सोयाबीन तेलाचे दर ९१ रुपयांवरून ९७ रुपये, मोहरी तेलाचे दर १०५ रुपयांवरून १०८ रुपये, शेंगदाणा तेल १५४ रुपयांवरून १५८ रुपयांवर पोहोचले आहे. हे घाऊक दर असून किरकोळ दर याहून अधिक आहेत. एकंदर खाद्यतेल बाजाराची स्थिती पाहता आणखी दरवाढीची चिन्हे निश्चितच आहेत.’

    सर्वाधिक फटका सोयाबीनला

    खाद्यतेलबिया उत्पादनात सर्वाधिक फटका सोयाबीनला बसला आहे. १५८ लाख टन लक्ष्याच्या तुलनेत खरिपात फक्त ११५.२८ लाख टन उत्पादन होत आहे. तर, ९२.५० लाख टन भुईमुगाच्या तुलनेत ७८.२९ लाख टन उत्पादन यंदा होत आहे.

    तेलबियांच्या खरिपातील उत्पादनाची स्थिती (लाख टनांत)

    तेलबियांचा प्रकारमागील वर्षीयंदाचे लक्ष्यउत्पादन
    सोयाबीन१४९.८५१५८११५.२८
    भुईमुग८५.६२९२.५०७८.२९
    एरंडी१९.८०२२.४०१६.६९
    तीळ३.९२८.६५४.१९
    सूर्यफूल२.०४१.५००.६४
    जवस०.२९०.६५०.२४
    एकूण२६१.५०२८३.७०२१५.३३

    (स्रोत : केंद्रीय कृषी मंत्रालय)

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *