राज्यात सध्या गायीच्या दुधाचा महापूर वाहत असून त्याला मागणी नसल्याने त्याची मोठ्या प्रमाणात भुकटी तयार केली जात आहे, त्यालाही आंतरराष्ट्रीय बाजारात दर आणि मागणी नाही. यामुळे सहकारी आणि खासगी संघाचे गोडावून भुकटीने भरलेली आहेत. विक्रीच नाही तर दर कुठला देणार म्हणून संघांनी दूधाचे दर कमी केल्याने उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसत आहे.
राज्यात एक कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांकडून रोज दीड कोटी लिटरपेक्षा अधिक गायीच्या दूधाचे संकलन होत आहे. म्हैशीला दुधाला मागणी असली तरी या गायीच्या दुधाला फारशी मागणी नाही. त्यामुळे दूग्धजन्य पदार्थ व पावडर निर्मितीसाठीच त्याचा वापर केला जात आहे. पण गेले दोन तीन महिने या पावडरलाही आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी नाही. यातून दर कोसळले आहेत. पावडरला उठाव नसल्याने गोडावून भरलेली आहेत. यातून उलाढाल थंडावली आहे.
राज्यात सध्या दुधाची मागणी आणि उत्पादन यामध्ये फरक आहे. पण येत्या दोन तीन महिन्यात उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत पावडरसह दुग्धजन्य उत्पादनावर भर देवून शेतकऱ्यांना चांगला दर देण्याची गरज आहे.
– चेतन नरके, दूग्ध अभ्यासक
गायीच्या दूधाला ३४ रूपये भाव द्यावा अशी सरकारची घोषणा असली तरी प्रत्यक्षात संघामार्फत २७ ते ३० रूपयेच दर दिला जात आहे. यामुळे उत्पादकांना त्याचा फटका बसत आहे. खप नाही तर दूध घेऊन करायचे काय? म्ह्णत संघांनी अनेक ठिकाणी ते नाकारण्याची भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यात अतिरिक्त उत्पादन होत असतानाच कर्नाटक आणि गुजरातमधून आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. याबाबत गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरूण डोंगळे यांनी सांगितले की, इतर राज्यात हीच अवस्था असली तरी तेथे लिटरमागे उत्पादकांना सरकार अनुदान देत आहे. त्यामुळे याच पद्धतीने राज्यात अनुदान द्यावे अशी मागणी सरकारकडे केली आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
राज्यात रोजचे दूध संकलन : दीड कोटी लिटर
प्रत्यक्षात मागणी : एक कोटी लिटर
रोजची पावडर निर्मिती : ६०० मे. टन
बटर निर्मिती : ३०० मे. टन
राज्यातील दूध पावडर प्रकल्प : २०
भुकटीचा दर २०० ते २२०, बटर ३१० ते ३५० प्रति किलो