• Tue. Sep 15th, 2026
सराफा व्यापाऱ्याची घरात घुसून हत्या, पोलीस तपासात धक्कादायक कारण समोर…

अमरावती : तिवसा येथील त्रिमूर्तीनगरातील रहिवासी एका सुवर्णकाराची त्यांच्या राहत्या घरात शिरून निघृण हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना सोमवारी सुमारास उघडकीस आली. चोरीच्या उद्देशाने हत्या करण्यात आल्याची चर्चा असून या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय भगवंतराव मांडळे (५५) असे मृतकाचे नाव आहे. संजय मांडळे यांचे शहरातील सराफा बाजार येथे दुकान आहे. ते पत्नी व मुलगा यांच्यासह त्रिमूर्तीनगर येथे राहतात. त्यांच्या पत्नीला नियमित डायलिसिस करावे लागते. त्यांचा मुलगा वैशाख हा आईला घेऊन अमरावती येथे रुग्णालयात गेला होता. त्यामुळे संजय मांडळे हे घरी एकटेच होते.

मुलगा वैशाख हा सायंकाळी आईला घेऊन घरी परतल्यावर त्याला वडील संजय हे रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडून असल्याचे दिसून आले. त्याने तातडीने घटनेची माहिती तिवसा पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यावेळी संजय मांडळे यांची हत्या करण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मृतदेहाला शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.

याबाबत माहिती मिळाल्यावर, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही घटनास्थळ गाठून पाहणी केली. चोरीच्या उद्देशाने ही घटना घडल्याची चर्चा असून पोलिसांचा तपास सुरू आहे. या घटनेचे वार्ता शहरात पसरल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed