• Mon. Nov 25th, 2024

    पालघर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका; शेतकरी, मच्छिमार, मीठ उत्पादकांचे मोठे नुकसान

    पालघर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका; शेतकरी, मच्छिमार, मीठ उत्पादकांचे मोठे नुकसान

    म. टा. वृत्तसेवा, पालघर : भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पालघर जिल्ह्यात रविवार नोव्हेंबर रोजी पहाटेपासून विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे कापणी झालेल्या भातपिकासह रब्बी पिकाचे व मच्छिमारांच्या वाळत घातलेल्या माशांचे मोठे नुकसान झाले.

    रविवारी पहाटे पाच वाजल्यापासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे पालघर, वसई, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, डहाणू या परिसरात शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. अवकाळी पावसामुळे भात कापणी झालेल्या आणि मळणी सुरू असलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले. शिवाय फळपिके, भाजीपाला, रब्बी पिकांनाही फटका बसला. पावसामुळे मच्छिमारांनी वाळत टाकलेल्या बोंबील, मांदेली, कर्दी, वाकट्या आदी मासळीचे नुकसान झाले.

    पालघर जिल्ह्यामध्ये २५, २६ आणि २७ नोव्हेंबरला हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून तीनही दिवसांसाठी जिल्ह्याला ‘यलो अॅलर्ट’ जारी केला आहे. शनिवार रात्री ते रविवारी सकाळपासून हलक्या पावसाची, तर रविवारी मध्यरात्री जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्याचा सल्ला हवामान आणि कृषी विभागाने दिला होता. त्यानुसार, शेतकऱ्यांनी आपली पिके झाकून ठेवली होती. मात्र काही शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
    रब्बीच्या स्वप्नावर कोसळले आभाळ; नाशिक जिल्ह्यात पावसाचा धिंगाणा, गारपिटीने पिकांची माती
    पालघर जिल्ह्यात खरीप हंगामानंतर रब्बीच्या पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. तूर, वाल, भुईमूग, उडीद, मूग आदी पिकांबरोबरच वांगी, कोबी, टोमॅटो, फ्लॉवर, मिरची, पडवळ, कारली आदी पिकांची लागवड करण्यात आली आहे. मात्र पावसामुळे या लागवडीवरही परिणाम झाला आहे. हवेत गारवा निर्माण झाल्याने भाजीपाल्याला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

    वीटभट्ट्यांना फटका

    पालघर जिल्ह्यात सर्व शहरांमध्ये बांधकामे सुरू असल्याने, त्यासाठी लागणाऱ्या विटा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तयार होत असतात. दिवाळीच्या आधीपासून विटा तयार करण्याचे काम सुरू होते. या विटा भाजण्याआधीच अवकाळी पाऊस पडल्याने उत्पादकांचे मोठे नुकसान झाले.

    शेतकऱ्यांना सल्ला

    महाराष्ट्रात सध्या थंडी असताना, यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे भातकापणीची कामे पूर्ण करून घ्यावीत. कापून ठेवलेले किंवा झोडणी/ मळणी केलेले धान्य झाकून सुरक्षित ठिकाणी ठेवावे, पारिपक्व भाजीपाला, फुले व फळांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed