मिळालेल्या माहितीनुसार, साक्री शहरातील सरस्वती नगरात दौलत या बंगल्यात जोत्सना पाटील ह्या ब्युटी पार्लर चालवतात. काल त्यांचे पती काही कामानिमित्त संगमनेरला गेले असताना जोत्सना पाटील यांनी आपल्यासोबत कोणी तरी असावे म्हणून त्यांच्या २३ वर्षीय भाचीला आपल्या घरी मुक्कामाला बोलावून घेतले. रात्री १० वाजेच्या सुमारास दरवाजा वाजला जोत्सना पाटील यांना वाटले की आपले पती निलेश पाटील हे आले असावेत म्हणून या जोत्सना पाटील यांनी दरवाजा उघडला. त्यानंतर तोंडावर मास्क बांधलेले ५ जण जबरदस्तीने घरात शिरले. तसेच त्यांनी जोत्सना पाटील यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
जोत्सना पाटील यांच्या सांगण्यावरून, अंदाजे ३० ते ३५ वर्ष वयाच्या या तरुणांनी हिंदी भाषेत सोने कुठे आहे, अशी विचारणा केली. जोत्सना पाटील यांना मारहाण करतच घरातील बेडरूममध्ये एक कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने लुटून नेले. या लुटीत दरोडेखोरांनी लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. याच वेळी या जोत्सना पाटील यांच्यासोबत घरात असलेल्या त्यांच्या २३ वर्षीय भाचीचे हात मागे बांधून तिला सोबत घेऊन पसार झाले. त्यांनतर या महिलेने आरडाओरड केल्याने ही घटना उघडकीस आली.
आज धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दत्तात्रेय शिंदे हे पोलिसांच्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी ठसेतज्ञ आणि श्वान पथकही पाचारण करण्यात आले. साक्रीच्या आमदार मंजुळा गावित यांनीही घटनास्थळी भेट दिली. श्वान पथकाने पेरेजपूरकडे जाणारा माग दाखवला असून संबंधित तरुणीच्या मोबाईलचे लोकेशन घटनास्थळापासून एकही अंतरापर्यंत मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले जात आहे. त्यामुळे आता पोलीस ह्या दरोडेखोरांना कधी ताब्यात घेतात आणि तरुणीची कधी सुटका करतात हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.