जामखेड (ता. अंबड) येथे धनगर समाजास अनुसूचित जमाती आरक्षण देण्याच्या मागणीसाठी भगवान भोजने, भगवान आसाराम भोजने आणि देवलाल शिवाजी मंडलिक यांचे नऊ दिवसांपासून चाललेले आमरण उपोषण पालकमंत्री अतुल सावे, मंत्री संदिपान भुमरे आणि आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते सोडण्यात आले.
पाच नोव्हेंबरपासून धनगर आरक्षण मागणीसाठी आमरण उपोषण सुरू होते. आमदार गोपीचंद पडळकर, धनगर आरक्षण अभ्यास समितीचे अॅड. पाचपोळ यांनी भेट देऊन धनगर आरक्षण प्रक्रियेतील प्रगतीची अधिकृत माहिती उपोषण करणाऱ्या आंदोलकांना दिली. त्यानंतर शनिवारी आंदोलकांनी उपोषण सोडले. या वेळी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक आयुष नोपानी, तहसीलदार चंद्रकांत शेळके, पोलीस निरिक्षक रामेश्वर खनाळ,भाजपचे नेते कपिल दहेकर , सरपंच अॅड. रतन तारडे, रामभाऊ लांडे, अॅड अशोक तारडे, अॅड. मंजित भोजने, डॉ. गंगाधर पांढरे, बळीराम खटके उपस्थित होते.
धनगर आरक्षण अभ्यास समितीकडून एक महिन्यात अहवाल घ्यावा यासाठी त्यांना कार्यालय, कार्यालयीन अधिकारी-कर्मचारी आणि संशोधन, प्रवास इतर बाबींसाठी आवश्यक खर्च तातडीने देण्यात यावा. मुंबई उच्च न्यायालयाच्या सुनावणीत सरकारकडून सकारात्मक व तत्परतेने सहकार्य करण्यात यावे, महाराणी अहिल्यादेवी प्रबोधनी मंचाने दाखल केलेल्या धनगर आरक्षण खटल्याचा खर्च सरकारने द्यावा. जालन्यातील धनगर मोर्चातील गुन्हा रद्द करावा, धनगर समाजासाठी जाहीर केलेल्या योजनांसाठी आर्थिक तरतूद करावी, जालना येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी जागेचे तत्काळ हस्तांतरण करण्यात यावे या विषयावर सरकारकडून लेखी आश्वासन घेतल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले.
–