• Sat. Sep 21st, 2024

मराठवाड्याला दिलासा! ‘जायकवाडी’त उद्या पाणी पोचणार; दारणा, निळवंडे धरणांतून विसर्ग सुरु

मराठवाड्याला दिलासा! ‘जायकवाडी’त उद्या पाणी पोचणार; दारणा, निळवंडे धरणांतून विसर्ग सुरु

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणातून शंभर क्युसेकने विसर्ग करण्यात आला असून, १८८ किलोमीटरचे अंतर पार करीत सोडलेले पाणी जायकवाडी धरणात सोमवारी (२७ नोव्हेंबर) सकाळी पोहचणार आहे. निळवंडे धरणातूनही शंभर क्युसेकने विसर्ग करण्यात आला असून, पाणी दोन दिवसांत पोहचेल, अशी माहिती ‘कडा’ प्रशासनाने दिली. गोदावरी नदीपात्र कोरडे असल्यामुळे पाण्याचा अपव्यय वाढण्याची भीती आहे.

नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणातून गोदावरी नदीत शुक्रवारी मध्यरात्री १०० क्युसेकने विसर्ग करण्यात आला आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कार्यवाही करण्यात आली. नाशिक आणि नगर जिल्ह्यांतील धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. दारणा धरणातून सोडलेले पाणी ७० तासांपेक्षा अधिक वेळ घेऊन उद्या, सोमवारी सकाळपर्यंत जायकवाडी धरणात पोहचणे अपेक्षित आहे. दारणा धरणातून सोडलेले पाणी ५० किलोमीटरचे अंतर कापून नांदूर मधमेश्वर प्रकल्पात पोहचण्यास १७ ते २० तास लागणार आहेत. नांदूर मधमेश्वर ते जायकवाडी अंतर १३८ किमी असून, पाणी पोहचण्यास ७० तास वेळ लागणार आहे. शुक्रवारी मध्यरात्री सोडलेले पाणी सोमवारी सकाळी पोहचणे अपेक्षित आहे, असे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने (कडा) सांगितले. गंगापूर धरणाच्या विसर्गाचा मार्ग वेगळा असून, पाणी नांदूर मधमेश्वरपर्यंत एका दिवसात पोहचते. पण, गंगापूर धरणातून अद्याप विसर्ग सोडण्यात आलेला नाही. सध्या नदीचा प्रवाह सुरळीत नसल्यामुळे पाणी धिम्या गतीने पोहचत आहे.

पाणी अधिक प्रमाणात सोडल्यास पाण्याचा वेग वाढू शकतो. या मार्गातील कोल्हापूर बंधाऱ्यांचे दरवाजे काढण्यात येत आहेत. शिवाय, नदीपात्रात पाणी जिरण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे पाण्याचा अपव्यय अधिक होणार आहे. साडेआठ टीएमसी पाण्यापैकी पाच ते साडेपाच टीएमसी पाणी धरणात पोहचण्याची शक्यता आहे.
नाशिक भागविणार मराठवाड्याची तहान; जायकवाडीसाठी धरणातून आज ८.६ टीएमसी पाणी सोडणार
दरम्यान, पाटबंधारे विकास महामंडळाच्या आदेशानुसार मुळा धरणातून २.१० टीएमसी, प्रवरा प्रकल्पातून ३.३६ टीएमसी, गंगापूर धरणातून ०.५, गोदावरी दारणा प्रकल्पातून २.६४३ असे एकूण ८.६० टीएमसी पाणी जायकवाडी धरणात येणार आहे.

‘निळवंडे’तून विसर्ग सुरू

नगर जिल्ह्यातील निळवंडे धरणातून शनिवारी १०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. जायकवाडी धरणात प्रवरा नदीतून सांडव्याद्वारे पाणी सोडण्यात आले. या विसर्गात वाढ करण्यात येणार आहे. पाण्यात अडथळा येऊ नये म्हणून राहुरी तालुक्यातील रामपूर, केसापूर आणि श्रीरामपूर तालुक्यातील मांडवे, गळनिंब, वळदगाव, पढेगाव, मालुंजा, भेर्डापूर, वांगी, खानापूर व कमलापूर येथील बंधारा परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. प्रवाहाच्या मार्गात शेतकरी फळ्या टाकून पाणी अडविण्याची शक्यता आहे. त्यामुळे फळ्या काढण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed