साथीचे आजार रोखण्यासाठी पालिकेतर्फे विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. घरोघरी फुलदाण्या तसेच रिकामे टायर, करवंट्या, प्लास्टिकचे शेड, छत यासह टाकाऊ वस्तूंची तपासणी, धुम्रफवारणी, स्वच्छता आदी कामे नियमितपणे केली जातात. त्यानंतरही डासांमुळे साथीचे आजार पसरण्याचे प्रकार सुरूच आहेत. विशेषत: पावसाळ्यात हे प्रमाण सर्वाधिक असते. अॅनोफिलीस डासामुळे मलेरिया, तर एडिस डासामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव होतो. हे आजार टाळण्यासाठी नागरिकांनी घर-परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत असते.
कीटकांच्या प्रभावामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया असे आजार पसरतात तर पाणी साचून राहिल्यामुळे दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टायफॉइड, कॉलरा, कावीळ असे आजार होतात. यामध्ये किटकांपासून पसरणारे डेंग्यूसारखे आजार रोखण्यासाठी पालिका ‘इको बायो ट्रॅप’ तंत्रज्ञान वापरणार आहे. हा उपक्रम उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अशा तिन्ही ऋतूंमध्ये चालणार आहे. ‘स्टार्ट अप’अंतर्गत पालिकेच्या स्माइल कौन्सिल या बिझनेस इन्क्युबेशन सेंटरच्या मे. इको बायो कन्सलटिंगच्या या उपक्रमासाठी पालिका तीन कोटी खर्च करणार आहे.
१८ ठिकाणी प्रयोग
‘इको बायो ट्रॅप’ हे तंत्रज्ञान प्रायोगिक तत्त्वावर दादर जी/उत्तर वरळी विभागातून राबवण्यास सुरुवात होणार आहे. धारावीचा कुंभारवाडा, अण्णानगर/मुस्लीमनगर, धारावी बस आगार, राजीव गांधी सरकारी क्रीडा संकुल, माहीम फाटक, शिवाजी पार्क येथील इंदू मिल आवार, गोखले मार्ग, भवानी शंकर महापालिका शाळा, दादर भागात १८ ठिकाणी कुंड्या बसवण्यात येणार आहेत.
असे वापरणार तंत्रज्ञान
– इको बायो ट्रॅप उपक्रमात डासांची उत्पत्ती होऊ शकणाऱ्या संभाव्य ठिकाणी कुंड्या बसवणार
– कुंड्यांमध्ये पाण्यात डास आकर्षित करणारी इन्सेक्ट ग्रोथ (आयजीआर) पावडर मिसळली जाईल
– पावडरकडे डास आकर्षित होतील
– पावडरमुळे डासांनी अंडी घातली तरी ती नष्ट होतील