• Wed. Nov 27th, 2024
    ही लढाई आता सुरू झाली, एका पराभवाने मी खचणारा नाही; पराभूत अपक्ष उमेदवाराचा इशारा

    Raigad News: विधानसभा निवडणुकीत निसटत्या मतांनी पराभूत झालेले कर्जत मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी आपण एका पराभवाने खचणार नाही असे सांगत लढाई आता सुरू झाली आहे असा इशारा दिला आहे.

    Lipi

    रायगड(अमुलकुमार जैन): कर्जत विधानसभा मतदारसंघात माझ्या पराभवासाठी एकेकाळी आमनेसामने आलेले सर्व एकत्र आले.मात्र ही लढाई आता सुरू झाली असून एका पराभवाने मी खचणारा नाही हे त्यांनी लक्षात घ्यावे, असा इशारा कर्जत मतदारसंघातील पराभूत अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी दिला. दरम्यान कर्जत मतदारसंघात निसटत्या पराभवानंतर सुधाकर घारे कार्यकर्त्यांसमोर बोलताना त्यांचा करेक्ट कार्यक्रम 2014 मध्ये झाला असता,त्यामुळे त्यांच्या पुतण्याने पोपटपंच्छी बंद करावी, असा इशारा देखील घारे यांनी दिला.

    राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कर्जत मतदारसंघात अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी कडवी झुंज दिली. त्यामुळे निकालामध्ये चुरस निर्माण होऊन सर्वांच्या काळजाचे ठोके प्रत्येक क्षणाला चुकत होते. मात्र घारे यांची ही झुंज अपयशी ठरत काही मतांनी ते पराभूत झाले. त्यामुळे आता घारे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना सुधाकर घारे यांनी आज कर्जत येथे कार्यकर्त्यांना बोलावून नव संकल्प सभेचे आयोजन केले होते.

    सुधाकर घारे यांनी बोलताना कर्जतचे माजी नगराध्यक्ष राजेश लाड यांच्यावर निशाणा साधला राजेश लाड यांच्या म्हणण्यानुसार आमच्या दोन भावांमध्ये वाद आहेत. मात्र २०१४ च्या निवडणुकीत तुम्हाला निवडून येण्याची शास्वती नव्हती तेव्हा याच सुधाकर घारेला आपण घरातून घेऊन गेलात आणि नेतृत्व करायला सांगितले. याच सुधाकरने वासरे खोंडयात तुम्हाला लीड निवडणूक आलात. आमच्या भावांमध्ये वाद आहेत असं तुमचं म्हणणं असेल तर शरद लाड यांना नगरपरिषद निवडणुकीत कुणी पाडलं ? असा सवाल घारे यांनी उपस्थित केला. तर कार्यकर्त्यांना त्यांनी पुढील निवडणुकीसाठी आपण त्यांच्या सोबत असल्याचा विश्वास दिला. यासह आता रडायचं नाही लढायचं म्हणत घारे यांनी नवसंकल्प सभेतून पुढील तयारीला लागण्याचे संकेत दिले.

    कर्जत विधानसभा निवडणुकीतील निसटत्या पराभवानंतर सुधाकर घारे यांनी पुन्हा सक्रिय होत कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सुधाकर घारे यांनी मतदारांनी निवडणूकीत दिलेल्या निकालाचा स्वीकार करून जनतेच्या कौल आदरपूर्वी व्यक्त करीत असल्याचे स्पष्ट केले.पुढे बोलताना आपला हा पराभव शेवटचा नाही कारण ही शर्यत आता सुरू झालेली आहे.अपक्ष म्हणून लढतो आहे,आणि विजयाच्या समीप नेण्याचे काम कर्जत आणि खालापूर तालुक्यातील जनतेने केले.त्यामुळे आता विजय मिळविण्यासाठीच शर्यत सुरू केली असून आगामी प्रत्येक निवडणुकीत माझा पराभव करण्यासाठी एक झालेल्या विरोधकांना पराभूत करण्यासाठी आणि विजय मिळवण्यासाठी सज्ज झालो आहे, असा ठाम विश्वास व्यक्त केला. त्यासाठी आगामी निवडणुकांसाठी एकत्र राहून संघटनेला मजबूत करण्याचे आवाहन केले.

    सुधाकर घारे यांनी माजी आमदार सुरेश लाड आणि राजेश लाड यांच्यावर टीकास्त्र सोडले. २०१४ साली माझ्या वासरे खोंडा प्रभागातील आम्ही कार्यकर्त्यांनी पक्ष बळकट केल्यामुळेच आणि चांगल्या कामांमुळेच मी कर्जत मतदारसंघातील राजकारणात टिकून आहे, असे सांगत घारे यांनी माजी आमदार सुरेश लाड यांना लक्ष्य केले.तर माजी नगराध्यक्ष आणि सुरेश लाड यांचे बंधू शरद लाड यांचा पराभव होण्यासाठी लाड यांचे पुतणे राजेश लाड जबाबदार असल्याचे सांगत हा पोपट आता जास्त बोलू लागला असून आमच्या दोन्ही भावांमध्ये कधी वाद नव्हते आणि नाहीत, असे सांगून सुधाकर घारे यांनी राजेश लाड आपली कीव करावीशी वाटते असा टोमणा मारला. आदिवासी भागातील बुथवर मिळालेल्या पाठिंब्याचे त्यांनी कौतुक केले. या समाजाच्या विकासासाठी भविष्यातही कार्यरत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. निवडणूक काळात निवडणूक यंत्रणा यांच्याकडून प्रक्रियेत शासकीय गैरवापर झाल्याचा उल्लेख करीत त्यांच्या विरोधात योग्य ठिकाणी संघर्ष केला जाईल असे देखील घारे यांनी जाहीर केले.

    सुधाकर घारे यांनी संघटनेच्या बळकटीकरणासाठी नवनवीन योजना आखण्याचे महत्त्व पटवून दिले. कार्यकर्त्यांना एकत्र राहण्याचे आणि पक्षाची पायाभूत रचना अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले.सुधाकर घारे यांची नव संकल्प सभा केवळ राजकीय चळवळ नव्हती, तर “समाजपरिवर्तनाची चळवळ” होती. त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाने कार्यकर्त्यांना पुढील संघर्षासाठी सज्ज केले. “पेटेन उद्या नव्याने; हे सामर्थ्य नाशवंत नाही,” हा आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न या सभेच्या निमित्ताने सुधाकर घारे यांनी केला.

    यावेळी संतोष बैलमारे यांनी प्रास्तविक करताना खोपोली खालापूर भागात नागरिक मतदान करायला तयार होते मात्र आपण त्यांना मतदानापर्यंत घेऊन जायला कमी पडलो असे म्हणत चूक मान्य केली. मात्र यानंतर देखील आमचा नेता आमच्यासोबत खंबीरपणे उभा असल्याने आम्ही देखील पुढील वाटचालीसाठी तयार असल्याचे सांगितले. तर यावेळी बोलताना जेष्ठ नेते भरत भगत यांनी निवडणूक प्रशासन यांच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बूथ क्रमांक २१७ चे मशीन खराब झाले होते तर व्हिव्हिपॅट मधील चिठ्या मोजण्याची गरज होती. मात्र त्या १०१४ मते ग्राह्य धरलीच नाहीत त्यामुळे तेथील नागरिकांचा अधिकार मारला गेला असल्याचे सूचित केले. यासह विरोधकांना त्यांनी चांगलेच फैलावर घेतले.

    कर्जतच्या रॉयल गार्डन सभागृहात आयोजित नव संकल्प सभेत सुधाकर घारे यांच्यासह भरत भगत,अशोक भोपतराव,विलास थोरवे,भगवान भोईर,एकनाथ धुळे,ॲड निगुडकर, अंकित साखरे,भगवान चंचे, कय्युम पाटील,संतोष बैलमारे,सुनील गायकवाड आदी सह अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

    जयकृष्ण नायर

    लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed