शहरातील गंगापूर रोड, कॉलेज रोड, सीबीएस, शालिमार यांसारख्या प्रमुख रस्त्यांसह उपनगरांतील बाजारपेठांमध्येदेखील अजूनही इंग्रजी फलकांचेच वर्चस्व दिसून येत असताना महापालिका प्रशासन अद्यापही अंधारातच असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे मराठी फलकांबाबत राजकीय पक्षांमध्येही अनास्था दिसून येत असल्याने मनसे, शिवसेनेचा गड असलेल्या नाशिकमध्ये आजही इंग्रजीच वरचढ असल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारने सन २०११ मध्ये मराठी भाषा सक्तीची केली आहे. त्यानंतर सुधारित आदेश सन २०१५ मध्ये काढताना इंग्रजीतील फलक मराठीत करण्याचे बंधन कायद्याने घातले आहे. मुंबई, ठाणे या शहरांमध्ये बहुतांश ठिकाणी या कायद्याची अंमलबजावणी झाली असली, तरी नाशिक महापालिका क्षेत्रात मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. मराठीच्या सक्तीसाठी अनेक कायदे असतानाही त्याच्या अंमलबजावणीकडे यंत्रणांनी केवळ कागदी घोडे नाचविण्यापलीकडे काहीच केलेले दिसत नाही. दर वर्षी मराठी भाषा दिवस आला, की २८ फेब्रुवारीपूर्वी शहरातील खासगी, शासकीय आस्थापनांना मराठी फलक लावण्यासंदर्भातील नोटिसा देण्याचे सोपस्कार पार पाडले जातात.
सरकारदप्तरी व राज्यभरातील विविध आस्थापनांच्या नामफलकांवरील इंग्रजीचे वाढते अवडंबर लक्षात घेत राज्य सरकारने मराठी सक्तीसाठी आतापर्यंत तब्बल नऊ वेळा कायदे करून परिपत्रके काढली. परंतु, त्यांचीही अंमलबजावणी होत नसल्यामुळे तक्रारदारांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत मराठीच्या सक्तीसाठी याचिका दाखल केल्या. अखेरीस सर्वोच्च न्यायालयानेच आता राज्यात मराठी फलकांसाठी सर्व आस्थापनांना २५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाची मुदत आज, शनिवारी संपुष्टात येत असतानाही नाशिक शहरातील सरकारी, खासगी आस्थापनांच्या फलकांवर आजही इंग्रजीचेच वर्चस्व दिसून येत आहे.
५३ हजार नोटिसा कचऱ्यात
महापालिकेच्या सर्वेक्षणानुसार शहरात ५३ हजार १८ अनिवासी मिळकती आहेत. त्यातील बहुतांश मिळकतींवर इंग्रजी भाषेतील नामफलक लावण्यात आलेले आहेत. मराठी बंधनकारक असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने सहा विभागीय अधिकाऱ्यांकडून मराठीत फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेषत: शरणपूर रोड, कॉलेज रोड, गंगापूर रोड, कॅनडा कॉर्नर आदी भागातील दुकानदारांना नोटिसा पाठवून मराठीची सक्ती करण्यात आली होती. परंतु, पालिकेच्या नोटिसांनाच या आस्थापनांनी केराची टोपली दाखविल्याचे चित्र आहे.
-राजसत्तेचीच पाठ, सामान्य जनता करणार तरी काय?
-शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांकडून उपेक्षा
-मनसेवगळता अन्य राजकीय पक्षांची चुप्पी संशयास्पद
-यंत्रणांकडून कागदी घोडे नाचविण्याचाच प्रकार
-महापालिका प्रशासन अद्यापही अंधारातच
-मराठीसाठी कायदे ढीगभर, अंमलबजावणीबाबत अनास्था
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचीही अंमलबजावणी दुकानदार करीत नसतील, तर अशा दुकानदारांना ‘मनसे स्टाइल’ने उत्तर दिले जाईल. पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्तांना याबाबत निवेदन देऊन मराठी फलकांचा आग्रह धरला जाईल. राज ठाकरेंच्या आदेशाचे पालन केले जाईल.-सुदाम कोंबडे, शहराध्यक्ष, मनसे